काँग्रेसने शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला पंतप्रधानपदाची संधी दिली नाही…. : PM मोदी यांची थेट टीका

काँग्रेसने शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला पंतप्रधानपदाची संधी दिली नाही…. : PM मोदी यांची थेट टीका

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तर काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत काँग्रेसवर प्रहार केले. मात्र त्याचवेळी मागील महिन्यात टोकाची टीका केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मात्र त्यांनी तोंडभरुन कौतुक केले. (Prime Minister Narendra Modi targeted Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray and congress)

काल (8 ऑगस्ट) रात्री उशीरा नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र, गोव्याच्या एनडीए खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल, नितिन गडकरी, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांच्यासह महाराष्ट्र, गोव्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

काय म्हणाले PM मोदी?

युती उद्धव ठाकरे यांनी तोडली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. शिवसेना-भाजपसोबत सत्तेत होती, पण त्यावेळी ‘सामना’तून माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत होते. मात्र आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि आमच्यावर टीका पण करायची आहे, या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? असा सवालही त्यांनी केला.

शरद पवारांना पंतप्रधानपदावरुन डावललं :

गत महिन्यात भोपाळ येथील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र काल त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले आणि शरद पवार यांचे कौतुक केले.

आम्हाला आमचे मित्र महत्वाचे :

भाजप मित्र पक्षांना सन्मानाची वागणूक देत नाही या टिकेवर बोलताना ते म्हणाले, बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे आमच्यासाठी आमचे मित्र महत्वाचे आहेत. आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. भाजप काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेतून जाणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube