UPI ही सामान्य माणसाच्या व्यवहारातील गरज; शुल्काबाबतचा निर्णय मागं घ्या, राहुल गांधी आक्रमक
Rahul Gandhi on UPI : राहुल गांधी यांनी 'एक्स'वर व्हिडीओ पोस्ट करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला.
Rahul Gandhi on UPI : युपीआय व्यवहारांवरील नव्या Merchant Discount Rate (MDR) व्यवस्थेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निवडक व्यापारी UPI व्यवहारांवर MDR लागू करण्याचा निर्णय 15 ऑक्टोबरपासून अमलात येणार आहे. मात्र, UPI‘वरील शुल्काचा भार अखेरीस ग्राहकांवर पडू शकतो, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, अमेरिकेच्या दबावासमोर सरकार झुकत असल्याचा आरोप केला. अमेरिकन पेमेंट कंपन्या भारताच्या ‘झिरो-MDR’ धोरणाला दीर्घकाळ विरोध करत असल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी नव्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? ; केंद्र सरकारने दिली मोठी स्पष्टता!
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यापारी UPI व्यवहार एकूण व्यवहारसंख्येच्या सुमारे 5% असले, तरी त्यांच्या माध्यमातून होणारी रक्कम एकूण UPI व्यवहारमूल्याच्या जवळपास 65% आहे. दुकानदारांकडून MDR आकारला जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असले, तरी त्याचा परिणाम वस्तूंच्या किंमती वाढण्यातून ग्राहकांवर होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, केंद्र सरकारनं MDR हा सरकारकडून आकारला जाणारा कर नसून UPI व्यवस्थेतील बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांमध्ये वितरित होणारे शुल्क असल्याचे स्पष्ट केले आहे. 2,000 रुपयांपर्यंतचे व्यापारी व्यवहार, पात्र लघु व्यापारी आणि व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहार शुल्कमुक्त राहणार असल्याचेही सरकारनं सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सरकारनं UPIवरील शुल्काचा निर्णय मागं घ्यावा आणि अमेरिकेच्या दबावासमोर न झुकता भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.