Rajasthan Election : राजस्थानचा ‘जादूगर’ फेल, काँग्रेसचं नेमकं कुठं चुकलं?
Rajasthan Election : उत्तर भारतातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि लोकसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांना ‘टॉनिक’ देणारं राज्य (Rajasthan Election) म्हणजे ‘राजस्थान’. याच राजस्थानातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसचे जादूगर म्हणवले जाणारे अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची जादू मात्र चालली नाही. निवडणुकीचं बदललेलं वारं ओळखून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात गॅस सिलिंडर, आरोग्य विमा योजनेच्या मर्यादेत 50 लाख रुपयांची वाढ अशी जादूची कांडी त्यांनी फिरवली खरी पण, त्यावर भाजपचा प्रचारच भारी पडला.
राजस्थानातील पेपर लीक प्रकरण, लाल डायरी, महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पीएम मोदींपासून (PM Modi) सगळ्याच भाजप नेत्यांनी उचलून धरला. भाजपाच्या या प्रचाराला उत्तर मात्र काँग्रेसला सापडलं नाही आणि मोठं राज्य काँग्रेसच्या पंजातून निसटलं. अशी नेमकी कोणती कारण होती, ज्यामुळे काँग्रेसचा (Election Results 2023) पराभव आणि भाजपाचा (BJP) विजयाचा मार्ग सुकर झाला हे जाणून घेऊ या..
Rajasthan Elections : ..तर PM मोदीही वसुंधराराजेंना रोखू शकणार नाहीत; राजस्थानचं गणितच बदललं
पेपर लीक प्रकरण
पीएम मोदी यांनी प्रचारात पेपर लीकच्या मुद्द्यावर काँग्रेसला चांगलंच घेरलं. भाजप सत्तेत आला तर राज्यात जितके घोटाळे झाले आहेत त्यांची चौकशी करून दोषींना तुरुंगात डांबण्याचं आश्वासन मोदींनी दिलं.राज्यातील मोठमोठ्या कोचिंग संस्थांत छापेमारी केली तर त्यात मुख्यमंत्र्यांच्याच जवळचे लोक त्यात सापडतील असेही मोदी म्हणाले होते. या मुद्द्याचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून आले.
लाल डायरी
राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीचा मुद्दा नवा नाही. अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. पण मोदींनी त्यांच्या स्टाइलमध्ये हा मुद्दा उचलून धरत गेहलोतांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सरकारने पाच वर्षात जल, जंगल आणि जमिनी कशा विकल्या हे या लाल डायरीत स्पष्ट लिहिलं असल्याचं मोदींनी राजस्थानातील जनतेला सांगितलं. याचा इफेक्ट मतदानात दिसून आला.
Rajasthan Elections : वसुंधरा राजेंचा अपक्षाला फोन, काँग्रेसही अलर्ट; राजस्थानात काय शिजतंय ?
गटबाजीचा त्रास
राजस्थानात काँग्रेस अंतर्गत गटबाजी वाढली होती. त्याचाही परिणाम काँग्रेसच्या कामगिरीवर झाला. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोर आला होता. दोघांतील वाद मिटवताना काँग्रेस श्रेष्ठींच्या नाकीनऊ आले होते. याचा परिणाम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झाला तसेच जनमानसातही चुकीचा मेसेज गेला. काँग्रेस श्रेष्ठींनी डॅमेज कंट्रोल करत दोन्ही नेत्यांना सोबत आणलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
ईडीची एन्ट्री
पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ईडीची एन्ट्री झाली. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरापासून ते थेट काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरीही पेपर लीक प्रकरणात छापेमारी केली. या मुद्द्यावर काँग्रेसनेही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. पण, याचा फायदा भाजपालाच झाला.