मोठी बातमी : राम मंदिरातील देणगी वाद; एसआयटीमार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय
Ram Mandir-श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
Ram Mandir Donation Row SIT Investigation-अयोध्या राम मंदिरात (Ram Mandir) अर्पण केलेले सात कोटी रुपये चोरी गेल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टची बदनामी होत आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टने शनिवारी मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) यांच्याकडे चोरीच्या दाव्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री योगी यांनी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पथक मंदिर परिसरातील दानपेट्यांबाबत करण्यात आलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. आठवड्यात प्राथमिक अहवाल आणि पंधरा दिवसांत अंतिम अहवाल सरकारला सादर करायचा आहे. या पथकात लखनौचे विभागीय आयुक्त आयएएस विजय विश्वास पंत, पोलीस महानिरीक्षक (आयजी) किरण एस. आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश करण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील दानपेट्यांबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असल्याने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती. या अफवांमुळे मंदिराची प्रतिमा आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का पोहोचत आहे. सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. ही मंदिराची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मागणीची गंभीर दखल घेत तातडीने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एसआयटीची स्थापना केली. हे पथक संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.
सक्षमच्या मृत्यदेहासोबत लग्न केलेल्या आंचलने का सोडल घर?, पहिल्यांदाच स्वत: सांगितल काय घडलं?
अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राम मंदिरातील देणगीतील कोट्यवधी रुपये गायब झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी या प्रकरणाची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणीही केली होती. 7 जून रोजी सोशल मीडियावरील ‘एक्स’ या माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, जगभरातील भगवान रामाच्या भक्तांसाठी ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. राम मंदिराच्या देणगीतून कोट्यवधी रुपयांची रक्कम गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ही बाब ट्रस्टसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे सांगत, कोणीही याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे येत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आणि विविध राजकीय नेते तसेच साधू-संतांनीही चौकशीची मागणी केली.
रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपुरात जाऊन बसणार उपोषणाला
चंपत राय यांचे स्पष्टीकरण
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ७ जून रोजीच स्पष्ट केले होते की, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे नियमितपणे अंतर्गत लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाते. या प्रक्रियेत ट्रस्टचे प्रतिनिधी आणि भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सहभागी असतात. त्यांनी सांगितले की, ऑडिटची प्रक्रिया अनेक दिवस चालते आणि सध्या देखील ती सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही गंभीर अनियमितता आढळून आलेली नाही. ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास यांनीही ट्रस्टच्या कामकाजावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, सरकारकडून होणाऱ्या कोणत्याही चौकशीस सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.
प्रकरणावरून राजकारण तापले
अखिलेश यादव यांनी पुन्हा आरोप केले होते. तर भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनीही देणगीच्या कथित गैरवापराबाबत माहिती असल्याचा दावा केला, मात्र त्याबाबत अधिक तपशील देण्यास नकार दिला होता. भाजपचे वरिष्ठ नेते रजनीश सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राम मंदिर ट्रस्टची आर्थिक स्थिती, मालमत्ता, देणगीची रक्कम, खर्च, बँक खाती आणि जमीन व्यवहार यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.
काँग्रेसनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्वतःला या वादापासून दूर ठेवत, आपली जबाबदारी केवळ मंदिराच्या बांधकामाच्या देखरेखीपुरती मर्यादित असल्याचे सांगितले. देणगी आणि कथित आर्थिक अनियमिततेसंदर्भातील आरोपांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला होता.