रुपया 94.85 वरून 93.59 पर्यंत मजबूत; RBIच्या हस्तक्षेपामुळे चलनबाजारात मोठी उलथापालथ
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या भारतीय रुपयाला आठवड्याच्या सुरूवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे.
RBI intervention causes major upheaval in the currency market : गेल्या बऱ्याच दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या भारतीय रुपयाला आठवड्याच्या सुरूवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 130 पैशांनी मजबूत होत 93.59 या पातळीवर उघडला. यापूर्वीच्या व्यवहारात रुपया 94.85 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदार आणि बाजारातील सर्वच घटकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
या घसरणीनंतर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वाचा डाव खेळला आहे. आरबीआयने सर्व बँकांना विशेषतः खासगी आणि परदेशी बँकांना, त्यांच्या भारतीय रुपयातील नेट ओपन पोजिशन 100 मिलियन डॉलरच्या मर्यादेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ही अट 10 एप्रिलपर्यंत काटेकोरपणे पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे बँकांना त्यांच्या आधीच्या मोठ्या पोजीशनमध्ये बदल करावा लागणार आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या पावलामुळे सुमारे 18 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या रकमेची स्क्वेअर ऑफ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, बँका त्यांच्या ओपन पोजिशन्स बंद करतील किंवा कमी करतील, ज्यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयाला मजबूत होण्यासाठी आधार मिळेल.
मार्च महिन्यात मध्यपूर्वेत सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला होता. या भू-राजकीय तणावामुळे रुपया 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आणि आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये त्याची गणना होऊ लागली. या काळात आरबीआयने स्पॉट आणि फॉरवर्ड मार्केटमध्ये हस्तक्षेप करून रुपयाला आधार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता घेतलेला निर्णय अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, रुपयातील ही सध्याची मजबुती दीर्घकालीन मूलभूत आर्थिक घटकांमुळे नसून, बँकांकडून त्यांच्या पोजिशन्स अन्वाइन्ड केल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती आहे. त्यामुळे ही तेजी काळापुरतीच राहू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच पाहता, आरबीआयच्या या रणनीतीमुळे रुपयाला तात्पुरता श्वास मिळाला असला, तरी जागतिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किंमती आणि भूराजकीय तणाव यावरच पुढील काळातील रुपयाची दिशा अवलंबून असणार आहे.