ब्रृजभूषण सिंह यांच्या कार्यक्रमात राडा, ताफ्यावरही दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

ब्रृजभूषण सिंह यांच्या कार्यक्रमात राडा, ताफ्यावरही दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Brijabhushan Sharan Singh : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या कार्यक्रमात आज मोठा गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला. ब्रृजभूषण उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सेल्फी काढण्यासाठी दोन गटात राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. (Ruckus at BJP MP Brijbhushan Sharan Singh’s event, stone pelting over selfie dispute)

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रृजभूषण शरण सिंह गोंडाच्या कटरा बाजार विधानसभा मतदारसंघातील बरबतपूर गावात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेल्फी काढण्यावरून सरपंच आणि माजी सरपंचामध्ये बाचाबाची झाली. आपापसात भिडणारे हे दोन्ही गट ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याच समर्थकांचे होते. ब्रृजभूषण यांचे समर्थक असलेले हे दोन गट सेल्फी घेण्याच्या मुद्दावरून गुद्द्यावर आले आणि त्यानंतर काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकच नाही तर यावेळी दगडफेकही करण्यात आली. ब्रृजभूषण यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. या कार्यक्रमात झालेल्या राड्यातून ब्रृजभूषण थोडक्यात बचावले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

गेल्या दिड महिन्यापासून दिल्लीत ब्रृजभूषण सिंह यांच्याविरुध्द आंदोलन सुरू होते. कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप त्यांच्यावर केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलन सुरू होते. सिंह यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार यावर कुस्तीपटू ठाम होते. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थिनंतर कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळ्या न्यायालयात १००० पानांचे आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी पॉक्सो प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बृजभूषण यांच्यावरील POCSO खटला मागे घेण्यासाठी पोलिसांनी निवदेनही केले. सरकारी वकिलांनी सांगितले की, अंतिम अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला असून POCSO प्रकरणी ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube