‘ईडी’ला मिळाले नवीन बॉस : PM मोदींच्या मर्जीतील संचालक अखेर सेवानिवृत्त

‘ईडी’ला मिळाले नवीन बॉस : PM मोदींच्या मर्जीतील संचालक अखेर सेवानिवृत्त

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील समजले जाणारे संजय कुमार मिश्रा अखेर अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदावरुन निवृत्त झाले. त्यांच्या जागी आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित संचालकाच्या नावाची घोषणा होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाचे प्रभारी संचालक म्हणून ते काम पाहणार आहेत. सरकारने काल एका आदेशाच्या माध्यमातून नवीन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. (Sanjay Kumar Mishra retired from the post of director of the Directorate of Enforcement)

मिश्रा यांची ED चे संचालक म्हणून 2018 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती, त्यांचा प्रारंभिक कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपणार होता. पण, त्यानंतर केंद्र सरकारने विशेष अधिकारांच्या माध्यमातून त्यांना तीनवेळा मुदतवाढ दिली. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी सीव्हीसी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. गतवेळी 31 जुलै 2023 रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यांना पुन्हा एकदा 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने फटकारत त्यांच्या मुदतवाढीला विरोध दर्शविला. पण राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवत 15 सप्टेंबरपर्यंतच्या मुदतवाढीला मान्यता दिली.

न्यायमूर्ती बी.आर. गवई, विक्रम नाथ, संजय करोल यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, सामान्य परिस्थितीत आम्ही असा अर्ज स्वीकारला नसता. पण मोठ्या जनहिताचा विचार करून आम्ही ईडी संचालकांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत काम सुरू ठेवण्याची परवानगी देतो. पण त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी केंद्राने केलेल्या कोणत्याही अर्जावर ते विचार करणार नाहीत. तुमच्याकडे अन्य सक्षम अधिकारी नाहीत का? तुमचा संपूर्ण विभाग असक्षम अधिकाऱ्यांनी भरला आहे, असे चित्र तुम्ही उभे करत नाहीत का? तुमच्याकडे एकच अधिकारी आहे का? यामुळे संपूर्ण दलाचे मनोधैर्य खचत नाही का? असे सवाल विचारत न्यायालयाने मिश्रा यांच्या मुदतवाढीला नकार दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube