जास्त तेल ओताल तर जळून खाक व्हाल…, जंतरमंतरवरून संजय राऊतांची मोदी सरकारविरोधात मोठी घोषणा
ही आपल्या समाजाची, देशाची मुलं आहेत. याच मुलांनी नरेंद्र मोदी तुम्हाला 12 वर्षांपूर्वी सत्तेवर आणलं. कधीकाळी ही मुलं तुमची भक्त झाली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Jantarmantar) आज दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी राऊत यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला अभिजीत दीपके त्यांच्यासोबत होता. नंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडं जाऊन अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ही ठिणगी पडताना दिसत आहे. काल जो प्रकार दिल्लीच्या रस्त्यावर झाला, तो लोकशाहीला लाजवणारा होता अशी टीका राऊत यांनी केली.
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली, तर आम्ही इथे येऊन बसू अशी घोषणा संजय राऊत यांनी केली. आम्ही तुमच्या जेलला, बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही. आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात आम्ही सुद्धा आहोत. काल जे झालं इतका घृणास्पद प्रकार कोणी केलेला नाही, मला इदी अमीनची आठवण झाली असंही राऊत म्हणाले.
जंतर-मंतरवर लागलेली ही आग देशहिताची, राष्ट्रहिताची आहे. ती विझणार नाही. अभिजीत आहे. कालच्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने युवा एकत्र जमले होते. देशभरातली युवक, गावातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. आमच्यासारखे लोक इथे येऊन बसतील. आम्हाला मरणाची, जेलची भिती वाटत नाही” असा राऊत यांनी इशारा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला इतकी मारहाण झाली असती तर तिला काय वाटलं असतं असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
ही आपल्या समाजाची, देशाची मुलं आहेत. याच मुलांनी नरेंद्र मोदी तुम्हाला 12 वर्षांपूर्वी सत्तेवर आणलं. कधीकाळी ही मुलं तुमची भक्त झाली होती. आज या सगळ्या मुलांनी तुमच्याविरुद्ध बंड पुकारलं आहे. त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता. हे मोदी सरकार ट्रम्प, नेतन्याहू यांच्यासमोर गुडघे टेकतं. पण मुलांसमोर गुडघे टेकणार नाही” अशी टीका राऊत यांनी केली. मुलं, विद्यार्थी विरोधीपक्षाचं काम करतायत असं वाटत नाही का तुम्हाला? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं उत्तर दिलं.