SEBI : सेबी’चा नवा गुंतवणूक पर्याय; पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त लवचिकता

SEBI’s New Investment Option : सेबीने स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) अर्थात विशेष गुंतवणूक निधी हा नवा गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त लवचिकता आणि पीएमएसपेक्षा कमी गुंतवणुकीची संधी देणारा (Investment) हा एक नवा गुंतवणूक पर्याय आहे.
या प्रकारामुळे गुंतवणूकदारांना ‘पीएमएस’प्रमाणे प्रगत, सक्रिय गुंतवणूक धोरणांचा लाभ घेता येतो, त्याचबरोबर म्युच्युअल फंडासारखी नियामक सुरक्षा आणि पारदर्शकताही मिळते. सेबीकडे या स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडासाठी दोन म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून अर्ज आले आहेत. त्यांना काही दिवसांत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लवकरच गुंतवणूकदारांना ‘एसआयएफ’मध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल.
वैशिष्ट्ये काय आहेत?
किमान गुंतवणूक : ‘एसआयएफ’मध्ये किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
गुंतवणूक धोरणे : यात तीन मुख्य धोरणे असतात. इक्विटी-ओरिएंटेड, डेट-ओरिएंटेड आणि हायब्रिड फंड (संमिश्र)
रचना : ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड किंवा इंटरव्हल फंड असू शकतात.
जास्त लवचिकता : फंड मॅनेजरना पोर्टफोलिओमध्ये जास्त बदल करता येतात.
नियंत्रण व पारदर्शकता : ‘सेबी’ने ‘एसआयएफ’साठी स्पष्ट नियम व मर्यादा घातल्या आहेत. ‘एएए’ रेटेड डेट फंडांमध्ये २० टक्के गुंतवणूक, पोर्टफोलिओ गुंतवणूक एकाच शेअरमध्ये कमाल १० टक्के आदी.
डेरिव्हेटिव्ह : ठराविक मर्यादांसह डेरिव्हेटिव्ह, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्येही गुंतवणूक करण्याची मुभा आहे.
‘एसआयएफ’साठी निकष
फक्त ‘सेबी’ नोंदणीकृत म्युच्युअल फंड कंपन्यांनाच ‘एसआयएफ’ सुरू करता येईल.
कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मागील तीन वर्षांत किमान १० हजार कोटी रुपये असणे किंवा मुख्य गुंतवणूक अधिकाऱ्याकडे १० वर्षांचा अनुभव आणि किमान ५,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.