Karnataka : सिद्धरामय्यांच्या शपथविधीला पवारांची ‘खास’ उपस्थिती; विरोधकांच्या एकजुटीकडे ठाकरेंनी फिरविली पाठ

Karnataka : सिद्धरामय्यांच्या शपथविधीला पवारांची ‘खास’ उपस्थिती; विरोधकांच्या एकजुटीकडे ठाकरेंनी फिरविली पाठ

बंगळुरु : काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले. बंगळुरुमधील श्री क्रांतीवीरा मैदानावर सिद्धरामय्या यांच्यासह डी. के. शिवकुमार आणि ८ आमदारांचा शपथविधी आज (२० मे) पार पडला. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांची खास उपस्थिती होती. काँग्रेस आणि मित्रपक्षांचेही अनेक बडे नेते, मुख्यमंत्र्यांनी या शपथविधी सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. (Sharad Pawar attends the swearing-in ceremony of the newly-elected Karnataka Government in Bengaluru)

कोणकोणते नेते होते उपस्थित?

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, अभिनेते आणि मक्कल निधी मैयामचे प्रमुख कमल हसन, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, अनेक राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बडे नेते असेही अनेक नेते उपस्थित होते.

शरद पवारांची खास उपस्थिती तर उद्धव ठाकरेंनी फिरविली पाठ :

दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांनी खास उपस्थिती लावली होती. पवार यांनी आपल्याला मल्लिकार्जून खर्गे यांचा फोन आला होता, अन् त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यानुसार आपण जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज पवार यांनी बंगळुरु गाठत शपथविधी सोहळ्यात उपस्थिती दर्शविली. यावेळी राहुल गांधी यांनी पवार यांचे विशेष स्वागत करत त्यांच्याशी चर्चा केल्याचंही दिसून आलं.

मल्लिकार्जून खर्गे यांनी या सोहळ्यासाठी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी या सोहळ्याला जाणे टाळले. पण त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांना बंगळुरुला पाठविले होते. सोबतच उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छाही देण्यात आल्या. मात्र ठाकरे यांनी जाण्याचे का टाळले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube