वांगचुक प्रकरण आता थांबणार नाही… दिल्लीतील घडमोडींवर पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन
पाच-सहा दिवसांत सोनम वांगचुक यांना अटक होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती आणि अखेर तसेच झाले
पाच-सहा दिवसांत सोनम वांगचुक यांना अटक होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती आणि अखेर तसेच झाले असे म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आंदोलनाची पुढची दिशा सांगितली आहे. वांगचुक यांची मागणी काय होती? संबंधित मंत्र्यांचा राजीनामा. या आंदोलनात सरकारने आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली नाही असेही पवार म्हणाले.
आता पुढे काय?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून तिथे आंदोलन करत आहेत. मात्र, आज दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनस्थळी मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. पण, वांगचुक यांना ताब्यात घेतले असले तरीही हे आंदोलन सुरूच राहील, असे पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, “गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांना अटक होईल, अशी अपेक्षा होती आणि अखेर तसेच झाले. त्यांच्या आंदोलनात संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. मात्र, हा केवळ एकच मुद्दा नव्हता, तर इतरही अनेक महत्त्वाच्या विषयांचा त्यात समावेश होता.”
ते पुढे म्हणाले की, “सोनम वांगचूक यांनी विविध मागण्या मांडल्या, मात्र केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेतली. आंदोलन सुरू असताना सरकारमधील एकाही प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली नाही. यावरून केंद्र सरकारची भूमिका पूर्णपणे बेजबाबदार असल्याचे दिसून येते.”
पवार यांनी सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी वांगचूक यांची भेटही घेतली होती. आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतरच सरकारने पहाटे वांगचूक यांना अटक केल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी येत्या 14 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे सांगत हे प्रकरण इथेच थांबणार नसल्याचा इशाराही शरद पवार यांनी दिला.