Shivsena Vs BJP : शिंदेंची भाजपवर मात GenZ मतांसाठी आखला खास ‘मास्टर’ प्लॅन….

Eknath Shinde Special Plan For GenZ Voter नीट-यूजी वादावरून पेटलेले विद्यार्थी आंदोलन ही केवळ एका परीक्षेपुरती मर्यदित घटना नव्हती; तर...

  • Written By: Published:
Shivsena Vs BJP

Eknath Shinde Special Plan For GenZ Voter : 2029 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतच तरुण मतदारांना आकर्षित करण्याची चुरस सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बदलतं लोकसंख्याशास्त्र, सोशल मीडियाची वाढती ताकद आणि Gen Z मतदारांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) स्वतंत्र राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या पारंपरिक संघटनात्मक पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत युवा नेतृत्वाला संधी, डिजिटल संवाद आणि युवकांशी थेट संपर्क यावर शिंदे सेना भर देणार असल्याचे समजते.

तुम्ही तुमची पदवी जाहीर करा मी माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करतो, अभिजीत दिपकेंचं पंतप्रधानांना आव्हान

2029 मध्ये महाराष्ट्रात 4 कोटी, देशात 38 कोटी Gen Z मतदार?

अधिकृत निवडणूक आयोगाने 2029 साठी राज्यनिहाय Gen Z मतदारांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, उपलब्ध लोकसंख्या आणि मतदारांच्या अंदाजानुसार, 2029 पर्यंत देशात सुमारे 38 कोटी, तर महाराष्ट्रात 3.6 ते 4 कोटी Gen Z मतदार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा वर्ग देशातील सर्वात मोठा प्रौढ मतदारगट ठरणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांची भूमिका निर्णायक राहू शकते.

याच पार्श्वभूमीवर या मतदारवर्गापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी शिवसेनेकडून स्वतंत्र कृती आराखडा तयार केला जात आहे. लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून, Gen Z मतदारांशी संवाद वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युवा नेतृत्वाला मिळणार मोठी संधी

2029 च्यानिवडणुका डोळ्यास समोर ठेवत शिंदेंनी आखलेल्या या रणनीतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पक्षात नव्या युवा नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. केवळ निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता, पक्ष संघटनेतही तरुणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. पक्षातील युवा पदाधिकाऱ्यांसोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध युवक संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या तरुण चेहऱ्यांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे.

FD वर आता ‘समान व्याज’चा नियम; RBI च्या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

राज्यभर युवकांशी थेट संवादावर भर

शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत Gen Z मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी युवक मेळावे, संवाद अभियान आणि डिजिटल मोहिमा राबवण्याच्या सूचना पक्ष नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे. रोजगार, शिक्षण, स्टार्टअप, कौशल्य विकास, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सुशासन यांसारख्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर सातत्याने संवाद साधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

Gen Z इतके महत्त्वाचे का?

लोकसंख्येच्या अंदाजानुसार, 2029 पर्यंत 18 ते 32 वयोगटातील Gen Z ची संख्या देशात सुमारे 38 कोटींवर पोहोचू शकते. यामध्ये सुमारे 19.9 कोटी पुरुष आणि 18.1 कोटी महिला असतील. त्यामुळे Gen Z हा देशातील सर्वात मोठा प्रौढ मतदारवर्ग ठरण्याचा अंदाज आहे. तुलनेत मिलेनियल्सची संख्या सुमारे 35.7 कोटी राहू शकते.

हा वर्ग केवळ संख्येने मोठा नाही, तर विद्यार्थी, प्रथमच मतदान करणारे तरुण, करिअरची सुरुवात करणारे युवक आणि नव्या कुटुंबांची उभारणी करणारा मोठा सामाजिक घटक असल्यामुळे रोजगार, शिक्षण, महागाई, परवडणारी घरे, हवामान बदल, डिजिटल सुविधा आणि पारदर्शक प्रशासन यांसारखे मुद्दे 2029 च्या निवडणुकीत अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

टक्का कमी, पण प्रभाव अधिक

भारतातील लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत असली तरी Gen Z चा राजकीय प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे. 1988 मध्ये 18 ते 29 वयोगटातील मतदारांचा वाटा 38.3 टक्के होता. तो 2024 मध्ये 30.1 टक्क्यांवर आला असून, 2029 मध्ये तो 27.8 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. मात्र, राजकीय प्रभाव हा केवळ संख्येवर ठरत नाही. सोशल मीडियावरील मजबूत उपस्थिती, डिजिटल माध्यमांतून वेगाने संघटित होण्याची क्षमता, उच्च शैक्षणिक आकांक्षा आणि राष्ट्रीय प्रश्नांवर त्वरित भूमिका घेण्याची तयारी यामुळे Gen Z हा आज सर्वाधिक प्रभावी मतदारवर्ग मानला जात आहे.

Video : ‘Delulu’, ‘FOMO’ म्हणत शिंदे-सुळे संसदेत बोलले पण, नेमका अर्थ काय?

जंतर-मंतर आंदोलनानंतर बदलले राजकीय समीकरण

NEET-UG वादानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर Gen Z तरुण सहभागी झाले होते. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनानंतर तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे तरुण मतदारांची संघटन क्षमता आणि राजकीय ताकद अधोरेखित झाली. त्यानंतर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी Gen Z मतदारांकडे नव्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

2029 साठी शिंदे सेनेचा दीर्घकालीन आराखडा

सूत्रांच्या माहितीनुसार, 2029 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच वर्षी होणार असल्याने शिंदे सेनेने आतापासूनच दीर्घकालीन रणनीतीवर काम सुरू केले आहे. पक्षाने Gen Z ला केवळ मतदार म्हणून नव्हे, तर भविष्यातील नेतृत्व म्हणून घडवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नव्या पिढीतील चेहऱ्यांना संधी देणे, त्यांच्याशी थेट संवाद साधणे आणि डिजिटल माध्यमांवर प्रभावी उपस्थिती निर्माण करणे, हा पक्षाच्या आगामी राजकीय आराखड्याचा महत्त्वाचा भाग असणार असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असतानाही तरुण मतदारांसाठी स्वतंत्र रणनीती आखून शिंदे सेना स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, ही रणनीती प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते आणि 2029 च्या निवडणुकीत Gen Z मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, हेच महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

follow us