कारगिल युद्ध गाजवणारे आणि लडाखचे सिंह म्हणून ओळख असणारे सोनम वांगचुक यांचे निधन

त्यांच्या निधनामुळे फक्त लडाखचं नाही, तर संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण पसरले आहे. लेह येथे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

  • Written By: Published:
Untitled Design 66

Sonam Wangchuk passes away : लडाखच्या मातीत जन्मलेले आणि देशासाठी अभिमान ठरलेले निवृत्त कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन झाले आहे. लायन ऑफ लडाख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शूर अधिकाऱ्यांनी आपल्या पराक्रमाने कारगिल युद्धादरम्यान इतिहास रचला होता. त्यांच्या निधनामुळे फक्त लडाखचं नाही, तर संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण पसरले आहे. लेह येथे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांना छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवत होती.

कुटुंबियांच्या माहितीनुसार, अलीकडेच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्या संदर्भातील विधींसाठी ते लडाखमध्ये आले होते. या काळात सततची ये-जा आणि मानसिक ताण यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिमाण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 1999 मधील कारगिल युद्धात कर्नल वांगचुक यांनी दाखवलेले धैर्य आजही प्रेरणादायी मानले जाते. 30 मे 1999 रोजी त्यांनी अवघ्या 40 सैनिकांसह अत्यंत कठीण परिस्थितीत एक धाडसी मोहिम पार पाडली. सुमारे 18,000 फूट उंचीवर, प्रचंड थंडी आणि बर्फवृष्टीच्या वातावरणात त्यांनी मोठ्या संख्येने पाकिस्तानी घुसखोरांना पराभूत केले.

या संपूर्ण कारवाईत त्यांना तोफखान्याची कोणतीही मदत नव्हती. तरीही तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी आणि रणनितीने विजय मिळवला. ही लढाई भारताच्या सुरुवातीच्या निर्णायक विजयांपैकी एक ठरली आणि त्यानंतर भारतीय सैन्याने अनेक महत्त्वाच्या यशस्वी मोहिमा पार पाडल्या. या अद्वितीय शौर्यासाठी कर्नल वांगचुक यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च युद्धसन्मान महावीर चक्र प्रदान करण्यात आला. त्यांच्या धाडसाने आणि नेतृत्वाने अनेक जवानांना प्रेरणा दिली आणि त्यांची ओळख एक कर्तव्यदक्ष व निर्भय अधिकारी म्हणून निर्माण झाली.

 

11 मे 1964 रोजी जन्मलेले कर्नल वांगचुक हे लडाखमधील लेह जिल्ह्यातील संकर गावचे रहिवासी होते. त्यांनी जवळपास ३० वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावली आणि 2018 साली निवृत्त झाले. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या शौर्य, नेतृत्व आणि देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, वांगचुक हे लडाखच्या जिद्दीचे आणि भारताच्या विविधतेतील एकता” या मूल्याचे जिवंत प्रतीक होते.

कर्नल सोनम वांगचुक यांचे जीवन हे धैर्य, समर्पण आणि बलिदानाचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च मान देत त्यांनी देशासाठी लढा दिला. त्यांचा प्रेरणादायी वारसा पुढील अनेक पिढ्यांना देशभक्ती आणि सेवाभावाची दिशा देत राहील.

follow us