‘वंदे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक, 3 महिन्यांत 4 दगडफेकीच्या घटना
Vande Bharat Express : केरळमध्ये रेल्वेवर दगडफेकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आज (बुधवार) काही हल्लेखोरांनी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केली. या घटनेमुळे ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी उत्तर कन्नूर जिल्ह्यात दोन गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. त्याचवेळी कासारगोडहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवरील दगडफेकीनंतर आता रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना वटकाराजवळ दुपारी 4 ते 4.30 च्या दरम्यान घडली. या घटनेत ट्रेनच्या सी-8 बोगीच्या खिडकीचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काच बाहेरून फुटली आहे.”
कन्नूर जिल्ह्यात दोन गाड्यांवर दगडफेकीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र दोन्ही गाड्यांच्या एसी डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.
Rahul Gandhi : लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती
रविवारी संध्याकाळी मंगळुरू-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि कन्नूर दक्षिण आणि वलापट्टनम दरम्यान नेत्रावती एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही गाड्यांवर दगडफेकीच्या घटना अवघ्या 20 मिनिटांत घडल्या होत्या.
गाड्यांवर दगडफेकीच्या 4 घटना
2 एप्रिल रोजीही कन्नूरमध्ये ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील 27 वर्षीय शाहरुख सैफी याला अटक केली होती. NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. गेल्या 3 महिन्यांत केरळमध्ये ट्रेनवर दगडफेकीच्या 4 घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Assam Delimitation : आसाममध्ये विधानसभा, लोकसभेच्या जागा वाढणार; राष्ट्रपतींकडून मंजुरी
गेल्या एक वर्षात वंदे भारतावर दगडफेकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 26 जुलै रोजी सांगितले की, या प्रकरणांमध्ये 151 जणांना अटक करण्यात आली आहे.