ब्रेकिंग : युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याला मोठं यश; जम्मूत चकमकीत लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

  • Written By: Published:
ब्रेकिंग : युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याला मोठं यश; जम्मूत चकमकीत लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Three terrorists of Lashkar-e-Taiba killed in Encounter Jammu-Kashmir Shopian district :  पाकिस्तासोबतच्या युद्धबंदीनंतर आणिऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए- तैयब्बाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या या ठिकाणी चकमक सुरूच असल्याचे सांगितले जात असून, सुरक्षा दलाने आणखी काही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खात्मा करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील शुक्रू केलर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकात चकमक झाली. शोपियान जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले. यावेळी सुरूवातीला सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. त्यानंतर काही काळानंतर, आणखी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या शोधात सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरच्या विविध भागात सर्च ऑपरेशन राबविले जात आहे.

भारतीय सैन्य जंगलात दहशतवाद्यांना शोधत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. उर्वरित दहशतवाद्यांना सध्या शोध सुरु आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असून, यातील दोघांची ओळख पटली आहे.

दोघा दहशतवाद्यांची ओळख पटली

चकमकीत ठार करण्यात आलेल्या तिघा दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटवण्यात यश आले असून, शाहिद कुट्टय रा. छोटीपोरा हीरपोरा, शोपियान असे असून, ८ एप्रिल २०२४ रोजी डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबारात याचा सहभाग होता. या गोळीबारात दोन जर्मन पर्यटक आणि एक ड्रायव्हर जखमी झाले होते. याशिवाय १८ मे २०२४ रोजी शोपियानच्या हीरपोरा येथे भाजप सरपंचाच्या हत्येतही शाहिद कुट्टयचा सहभाग होता. तसेच ३ फेब्रुवारी २०२५ रोजी कुलगामच्या बेहीबाग येथे टीए कर्मचाऱ्यांच्या हत्येतही त्याचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे सांगितले जात आहे. आजच्या कारवाईत ठार करण्यात आलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे असून तो वंदुना मेल्होरा, शोपियानचा रहिवासी आहे. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी शोपियानमधील वाची येथे झालेल्या एका स्थानिक कामगाराच्या हत्येत अदनानचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

मोदींची आदमपूर एअरबेसला भेट

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यानंतर काल (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारले. त्यानंतर आज (दि.13) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली.  यावेळी मोदींनी वायूदलाच्या जवानांशी संवाद साधला तसेच शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल जवानांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube