Iran War : पुढील काही तास महत्त्वाचे; अमेरिकेला संबोधित करत ट्रम्प करणार युद्धबंदीची घोषणा?

Iran War गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराणयुद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • Written By: Published:
Iran War : पुढील काही तास महत्त्वाचे; अमेरिकन जनतेला संबोधित करत ट्रम्प करणार युद्धबंदीची घोषणा?

Trump Address Nation With An Important Update On Iran : आखाती देशात गेल्या महिन्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या युद्धबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजता ट्रम्प अमेरिकन नागरिकांना संबोधित करतील अशी माहिती व्हाईट हाऊसतर्फे देण्यात आली आहे. आता ट्रम्प युद्धबंदीची घोषणा करणार की, आणखी काही याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या भाषणाचा संपूर्ण तपशील जाहीर केलेला नाही, परंतु असे मानले जाते आहे की, ट्रम्प ज्यावेळी अमेरिकन जनतेला संबोधित करतील त्यावेळी युद्धबंदीशिवाय तीन मुद्द्यांवर भाष्य करून इराण सोबतच्यासंर्षासंदर्भात अमेरिकेची पुढील रणनीती जाहीर करू शकतील.
युद्धबंदीचे ट्रम्प यांच्याकडून संकेत

ट्रम्प यांनी नुकतेच संकेत दिले आहेत की, अमेरिकेने आपले लष्करी उद्दिष्ट साध्य केले आहे. तसेच इराणसोबतचे युद्ध साधारण दोन ते तीन आठवड्यात संपले असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे देशाला संबोधन महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी असा दावा केला की अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम रोखण्याचे आपले प्राथमिक उद्दिष्ट आधीच साध्य केले आहे.

इराणमध्ये घुसणार अमेरिकन सैन्य?

इराणसोबतचे युद्ध दोन ते तीन आठवड्यात संपुष्टात येईल असे संकेत खुद्द ट्रम्प यांनी दिले आहे. मात्र, या तीन आठवड्यांच्या कालावधीत अमेरिकन सैन्य इराणमध्ये घुसणार का? यावर ट्रम्प बोलू शकतात. कारण वृत्तांनुसार, ट्रम्प प्रशासन इराणमध्ये अमेरिकी सैन्य पाठवण्याचा विचार करत आहे. या मोहिमेचा उद्देश इराणचे उच्च संवर्धित युरेनियम सुरक्षित करणे असू शकतो. ही मोहीम अनेक दिवस चालण्याची शक्यता असून, यामध्ये किरणोत्सर्गी पदार्थ हटवण्याचे काम सोपवलेल्या विशेष प्रशिक्षित कमांडो दलांचा समावेश असेल.

इस्त्राइलची साथ सोडणार?

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरुद्ध युद्ध सुरू केले, परंतु आता दोन्ही बाजू परस्परविरोधी विधाने करत आहेत. एकीकडे ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत युद्धातून माघार घेण्याची तयारी दर्शवत आहेत, तर दुसरीकडे इस्रायलला हा संघर्ष सुरू ठेवायचा आहे. त्यामुळे ट्रम्प इस्त्राइलच्या भूमिकेवरून त्यांची साथ सोडणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे असेल. कारण, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, इस्रायल तेहरानविरुद्ध आपली लष्करी मोहीम सुरूच ठेवेल आणि इराणच्या दहशतवादी राजवटीला चिरडून टाकण्याचे काम करेल. त्यामुळे आता जर ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 आठवड्यांत इराणविरोधातील लष्करी मोहीम संपवली, तर इस्रायलला एकटे सोडले जाऊ शकते.

चीन-पाकिस्तानच्या फॉर्मुल्यावर होणार शिक्कामोर्तब?

वरील शक्यतांशिवाय मंगळवारी (दि.31) चीन आणि पाकिस्तानने पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी पाच-कलमी शांतता प्रस्ताव सादर केला आहे. ज्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीच्या मागणीचा समावेश आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी इराणमधील परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर हा शांतता प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावांमध्ये तात्काळ युद्धबंदी, शांतता चर्चेची लवकरात लवकर पुन्हा सुरुवात, गैर-लष्करी लक्ष्यांचे संरक्षण आणि नौकानयनाची सुरक्षितता, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेचे पालन आणि संरक्षण यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्रम्प चीन आणि पाकिस्तानने सूचविलेल्या सूत्राचा विचार करू शकतात, परंतु तीन युद्धखोर देशांची भिन्न उद्दिष्ट्ये आणि मागण्या पाहता त्यावर एकमत होणे कठीण असल्याचेही बोलले जात आहे.

 

follow us