उत्तर प्रदेशातील बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला; 6 मजुरांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

भीषण अपघातात आतापर्यंत किमान सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 5 2

Under-construction bridge collapses in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना समोर आली आहे. गुरुवारी उशिरा रात्री आलेल्या जोरदार वादळामुळे बेतवा नदीवर उभारण्यात येत असलेल्या निर्माणाधीन पुलाचा मोठा भाग अचानक कोसळला. या भीषण अपघातात आतापर्यंत किमान सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जेसीबी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी झाली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हमीरपुरमधील ‘मोरा कांडर’ आणि ‘कुरारा’ या भागांना जोडण्यासाठी बेतवा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी रात्री अचानक हवामान बदलले आणि वेगवान वादळासह पावसाने जोर धरला. याच दरम्यान पुलाचा जड स्लॅब अचानक कोसळला. त्यावेळी अनेक मजूर पुलावर काम करत असल्याने ते थेट मलब्याखाली दबले गेले. काही मजुरांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे हादरलं! पिंपरी चिंचवड ते हडपसर विषारी दारूमुळे 13 जणांचा संशयास्पद मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

या दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्राथमिक तपासात वादळाचा मोठा तडाखा हे कारण सांगितले जात असले तरी बांधकामाची गुणवत्ता, तांत्रिक निष्काळजीपणा आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, देशात गेल्या काही महिन्यांपासून पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील भागलपूर येथे गंगा नदीवरील विक्रमशिला पुलाचा भाग कोसळण्याची घटना अद्याप ताजी असतानाच जम्मूच्या बंतलाब भागातही निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला होता. आता हमीरपुरमधील या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा देशातील पायाभूत प्रकल्पांच्या दर्जा आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

follow us