कोर्टाच्या आवारातच शूटआऊट; २ आरोपींवर अंदाधुंद गोळीबार

  • Written By: Published:
कोर्टाच्या आवारातच शूटआऊट; २ आरोपींवर अंदाधुंद गोळीबार

जौनपूर : पोलीस कोठडीत माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच पोलीस बंदोबस्तात असलेल्या आरोपींवरील हत्येने  उत्तरप्रदेश पुन्हा एकदा हादरले आहे. जौनपूरच्या दिवाणी न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या कोठडीतील २ आरोपींवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वकिलांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (2 accused were shot in Jaunpur civil court premises)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुस्तीपटू बादल यादव यांची ६ मे २०२२ रोजी गौराबादशाहपूर पोलिस स्टेशन हद्दीतील धर्मपूर येथे हत्या झाली. या प्रकरणात सूर्य प्रकाश राय आणि मिथिलेश गिरी हे २ आरोपी आहेत. या दोघांनाही आज दिवाणी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. अशात जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाशेजारील दिवाणी न्यायालयात पोहोचताच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी दोन्ही आरोपींवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी घटनास्थळी उपस्थित वकिलांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह दिवाणी न्यायालयात दाखल झाले. या दरम्यान, जखमी सूर्यप्रकाश राय आणि मिथिलेश गिरी या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी वाराणसीला पाठविण्यात आले आहे. सध्या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलीस हल्लेखोरांची चौकशी करत आहेत. मात्र हल्लेखोरांची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

अतिक अहमद अन् अशरफची हत्या :

काही दिवसांपूर्वीच गँगस्टर (Gangster)ते राजकारणी (Politician) बनलेले अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिक आणि अशरफला उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात अतिक आणि त्याच्या भावावर ३ हल्लेखोरांनी डझनभर गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांच्या समोरच आणखी २ आरोपींवर गोळीबार करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube