विश्वभारती विद्यापीठात दाखवणार ‘India – The Modi Question’; राजनाथ सिंह हाकेच्या अंतरावर असतांना होणार प्रसारण
कलकत्ता : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर ‘इंडिया- द मोदी क्वेशन’ (‘India – The Modi Question’) नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला होता. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये बीसीसीने प्रदर्शित केलेल्या पंतप्रधान पीएम मोदी तसेच गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं विशेष स्क्रीनिंग प्रयत्न करण्याचा करण्यात आला होता. आता पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाचा गुरुवारी दीक्षांत समारंभ आहे. ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) प्रमुख पाहुणे म्हणून अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या एका गटाने BBCची वादग्रस्त डॉक्यूमेंट्री ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’ प्रसारित करण्याची घोषणा केली आहे.
बोलपूर पोलिसांनी डॉक्युमेंट्रीचे प्रसारण करण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांच्या गटाने त्याचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तसे न करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे बीरभूम भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धुरबा साहा यांनी असे कृत्य करणे म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता बोलपूर-शांतिनिकेतनला पोहोचणार आहेत. शुक्रवारी सकाळी दीक्षांत समारंभ होणार आहे. डॉक्युमेंट्री दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधील रतनपल्ली निमतळा घाटाची निवड केली आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून टेलिकास्ट सुरू होईल.
संध्याकाळी साडेसहा वाजता राजनाथ सिंह ज्या ठिकाणी टागोर यांचे संगीतमय भानु सिंघेर पदावली पाहणार आहेत, तेथून हे ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे. यानंतर ते विश्वभारतीचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांची भेट घेणार आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंदीचा निषेध
डीएसए नेत्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना संरक्षण मंत्री विश्वभारती येथे असल्याचे समजले, तेव्हा त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंदीचा निषेध करण्यासाठी मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी आणि जादवपूर युनिव्हर्सिटी एसएफआय स्टुडंट विंगने यापूर्वी कोणत्याही परवानगीशिवाय डॉक्युमेंट्रीचे प्रसारण केले आहे.
हा संरक्षणमंत्र्यांचा अपमान – भाजप
दुसरीकडे, बीरभूम भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धुरबा साहा यांनी विद्यार्थ्यांच्या या कृतीवर टीका केली आहे. माओवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या एका सदस्याने जाणीवपूर्वक हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले आहे. जेणेकरून त्याचवेळी BBCचा डॉक्युमेंट्री दाखवून संरक्षणमंत्र्यांचा अपमान करता येईल. जेएनयूमध्ये असेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या बनावट डाव्यांनी केला. पण भारतातील जनतेचा त्याच्यावर विश्वास नसल्याची टीकाही त्यांनी केली.
Sharad Pawar यांची ही खेळी… पण धनंजय मुंडे यांना धक्काबुक्की का झाली?
काय आहे संपूर्ण प्रकरण?
BBCने 17 जानेवारी रोजी ‘द मोदी क्वेश्चन’ या डॉक्यूमेंट्रीचा पहिला भाग यूट्यूबवर प्रदर्शित केला. दुसरा एपिसोड 24 जानेवारीला रिलीज होणार होता. त्यापूर्वीच केंद्र सरकारने पहिला एपिसोड यूट्यूबवरून काढून टाकला होता. पहिल्या भागाच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे लिहिले होते की, सदर डॉक्यूमेंट्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुस्लिम अल्पसंख्याक यांच्यातील तणाव दर्शवते. गुजरातमधील 2002 च्या दंगलीत नरेंद्र मोदींच्या भूमिकेच्या दाव्यांचा यात तपास करते.
गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीची स्थापना केली होती. या दंगलीत समितीला नरेंद्र मोदींविरोधात काहीही सापडले नाही. मोदींविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे एसआयटीने म्हटले होते. जून 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोदींना एसआयटीने दिलेली क्लीन चिट योग्य असल्याचे मान्य केले होते.