जिल्हा बँकेत विखे-थोरातांचा इतिहास पुन्हा जिवंत; विठ्ठलराव विखे-भाऊसाहेब थोरातांच्या जोडीची पुनरावृत्ती !

अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे, तर उपाध्यक्षपदी रणजित देशमुख विराजमान. 1968 मधील विठ्ठलराव विखे-भाऊसाहेब थोरातांच्या ऐतिहासिक समीकरणाची पुनरावृत्ती

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Sujay Vikhe

ADCC Bank: 1968 ते 1970 या कालावधीत विठ्ठलराव विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते.तर उपाध्यक्ष होते भाऊसाहेब थोरात. हे आजच आठवण्याचे कारण जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडी.बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख विराजमान झाले. यात एक साध्यर्म आहे विठ्ठलराव विखे हे सुजय विखे यांचे पणजोबा होते. तर रणजित देशमुख हे भाऊसाहेब थोरातांचे नात जावई आणि बाळासाहेब थोरातांचे जावई आहेत.

ज्याची जिल्हा बँकेवर सत्ता त्याची जिल्हावर सत्ता असे राजकारण अनेक वर्षे जिल्ह्यात चालू आहे. सध्याही तशीच परिस्थिती आहे. विखे आणि थोरात कुटुंबातील राजकीय संघर्ष अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. थोरात व विखे हे काँग्रेसमध्ये असताना थेट दिल्ली दरबारी राजकीय संघर्ष जात होता. परंतु जिल्हा बँकेत दोन्ही घराणे एकत्र दिसतात.


मोतीलालजी कुंदनमलजी फिरोदिया पाच वर्षे अध्यक्ष

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हावा, तो सावकाराच्या दारात जावू नये म्हणून जिल्हा बँकेची स्थापना झाली. मोतीलालजी कुंदनमलजी फिरोदिया यांच्या दूरदृष्टीतून या बँकेची उभारणी झाली. तेच बँकेचे पहिले अध्यक्ष झाले. 21 मार्च 1958 ते 26 जानेवारी 1963 या कालावधीत ते बँकेचे अध्यक्ष होते. तर कारभारी भीमाजी रोहमारे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. अध्यक्षपदावर असताना मोतीलालजी फिरोदिया हे 1962 लोकसभेवर नगर दक्षिणमधून निवडून गेले होते.


विठ्ठलराव विखे आणि भाऊसाहेब थोरातांनी जिल्हा बँक गाजविली

सुजय विखे यांचे पणजोबा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आजोबा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे जिल्हा बँकेवर अनेकदा अध्यक्ष होते. विठ्ठलराव विखे पाटील हे पहिल्यांदा 1968-1970 जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. त्याचवेळी भाऊसाहेब थोरात हे उपाध्यक्ष झाले होते. त्यापूर्वी थोरात हे 1965 ते 1968 या कालावधीत बँकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर विठ्ठलराव विखे पाटील हे 1971-1972, 1972-1973 या कालावधीत सलग दोन टर्म अध्यक्ष झाले. त्यानंतर 1973-1974 या कालावधीत भाऊसाहेब थोरात पुन्हा अध्यक्ष झाले. म्हणजे सुमारे बारा वर्षी दोन्ही सहकारमहर्षी जिल्हा बँकेवर दबदबा राखून होते आणि सहकारी कारखान्यांची भरभराट होत होती.


थोरात सहा वेळी अध्यक्ष, विखे घराणात पाचव्यांदा अध्यक्षपद

त्यानंतर 1995 ते 1997, 1997 ते 1999 मध्ये पुन्हा चार वर्षे भाऊसाहेब थोरात हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. म्हणजेच थोरात सहा टर्म अध्यक्ष होते. तर विठ्ठलराव विखे पाटील तीन टर्म अध्यक्ष राहिले. तर त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 2006-2007 ला जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. आता सुजय विखे यांच्या रुपाने विखे कुटुंबातील सदस्य जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालेला आहे. भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर थोरात घरात पुन्हा अध्यक्षपद गेले नाही. परंतु नात जावई रणजित देशमुख मात्र उपाध्यक्ष झाले आहेत. इतर वेळी राजकीय संघर्ष असलेले थोरात-विखे थोरात जिल्हा बँकेत एकत्र येतात आणि बँकेचा कारभारही हातात घेतात. सहकारी कारखाने टिकवणे, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करून बँक टिकविण्यासाठी दोघे एकत्र येतात, असे राजकीय समीकरण आहे.

सुजय विखेंना पद मिळाले आता पुढे काय ?
लोकसभा निवडणुकीपासून पदाच्या प्रतीक्षेत असलेले डॉ. सुजय विखे पाटील अखेर जिल्हा बँकेचे चेअरमन झाले. पण त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, बऱ्याच गोष्टी बाजूला ठेवत जुळवाजुळव करावी लागली. जुनं राजकारण जुने हिशोब बाजूला ठेवत नवे गणित जुळवून आणले आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात गटाकडे सर्वाधिक 13 संचालक होते. त्या बळावर थोरात आपला अध्यक्ष बसवू शकले असते. परंतु त्यांनी सुजय विखे यांना अध्यक्षपद दिले आहे. त्यात दोघांचे राजकारणही असू शकते. जिल्हा बँकेचे जाळे खेड्यापाड्यात आहेत. त्यामुळे सुजय विखेंनी पुन्हा एकदा भविष्यातील राजकारण पुढे नेण्यासाठी साखर पेरणी करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून ते पुन्हा लोकसभेची तयारीच करतील, त्याची झलक त्यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दंड थोपटून दाखवून दिलीय.

जिल्हा बँकेत थोरात-विखे हे दोघे एकत्र येत असले तरी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व इतर स्थानिक निवडणुकांमध्ये दोघेही एकमेंकाविरोधात दंड थोपटतात. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यावेळी त्यांचे राजकारण कसे असेल याकडे आता लक्ष लागून राहणार आहे.

follow us