Sharad Pawar : ‘ महाराष्ट्राची सुटका झाली’, पवारांचा कोश्यारींना टोला
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी यांनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा एक अतिशय चांगला निर्णय राष्ट्रपती व केंद्र सरकारने घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्राची सुटका झाली अशा शब्दात त्यांनी कोश्यारींना टोला लगावला. हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता पण आता घेतला तर ठीक आहे, असे पवार म्हणाले. तसेच आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी व्यक्ती महाराष्ट्राची राज्यपाल कधीही झाली नव्हती, असे म्हणत त्यांनी कोश्यारींवर निशाणा साधला. तसेच केंद्र सरकार व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे, असे पवारांनी म्हटले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या काळात जे काही संविधानाच्या विरुद्ध निर्णय घेतले गेले असतील त्यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी नियुक्ती केली आहे. बैसा हे सध्या झारखंड येथे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून देखील काम केले आहे.