Satyajeet Tambe : गेली वीस वर्षे झगडतोय! नाशिकच्या विजयाचे गणित माझ्या बाजूने…
नगर : महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा ही विधान परिषदेच्या नाशिक पदवीधऱ मतदारसंघाच्या निवडणुकीची होत आहे. काॅंग्रेसची उमेदवारी नाकारून (किंवा काॅंग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि नवा ट्विस्ट या निवडणुकीत आला. ऐनवेळी महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि सत्यजीत यांचा काॅंग्रेसशी संघर्ष का सुरू झाला, याचे स्पष्टीकरण अद्याप या दोघांनी दिले नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या खेळात मतदार नोंदणी आणि संपर्क या दोन्ही बाबी महत्वाच्या ठरतात. त्या जोरावरच अपक्ष उभ्या राहिलेल्या सत्यजीत यांचा विजयाचा दावा आहे.
सुधीर तांबे यांचा आमदार म्हणून या मतदारसंघात संपर्क होताच. त्यामुळे निवडणुकीसाठीची तयारीही त्यांनी आधीपासून केली होती. मतदारांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते.
नाशिक विभागात सर्वाधिक मतदार नगर जिह्यात आहेत. नगरमध्ये 1 लाख 15 हजार 638 मतदार (44 टक्के), नाशिक जिह्यात 69 हजार 652 (25 टक्के), जळगावमध्ये 35 हजार 58 मतदार (13 टक्के), धुळे जिह्यात 23 हजार 412 मतदार (10टक्के) व नंदूरबार जिह्यात 18 हजार 971 (7 टक्के) इतके मतदार आहेत. नगरमधील संगमनेर तालुक्यात सुमारे ३५ हजार मतदारांची नोंदणी आहे. येथून जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठीची सत्यजीत यांची यंत्रणा आधीपासूनच सज्ज आहे. तांबे कुटुंबाला येथूनच मोठ्या मतदानाची अपेक्षा आहे. त्यावरच विजयाची गणित निश्चित होणार आहेत.
विरोधी उमेदवार शुभांगी पाटील या धुळ्याच्या असून त्यांच्या जिल्ह्यात सुमारे २४ हजार मतदारांची नोंदणी आहे. तसेच या मतदारसंघातील अनेक महत्वाचे नेते सत्यजीत यांच्यासाठी पडद्याआडून काम करत आहेत. धुळ्यामध्ये भाजपचे आमदार अमरीश पटेल यांनी उघडपणे सत्यजीत यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली. इतर जिल्ह्यातील भाजपचे नेते पक्षाच्या आदेशानुसार शांत राहिले. कोणीही विरोधाची भूमिका घेतली नाही. तांबे यांच्यावर अन्यात होत असल्याची भूमिका घेत नगर जिल्हा काॅंग्रेसची फौज तांबे यांच्या पाठीशी उभी राहिली. काॅंग्रेसचा येथील जिल्हाध्यक्षच त्यांच्या गोटात गेल्याने तो देखील चर्चेचा विषय झाला. काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नसले तरी संगमनेरमध्ये आणि नगर जिल्ह्यातही त्यांची यंत्रणा तांबे यांचेच काम करत असल्याचे चित्र दिसून आले. शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नगरमध्ये येऊन शुभांगी पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. तिचा कितपत प्रभाव पडला, हे मतदानाच्या आकडेवारीतूनच कळेल.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थेटपणे शुभांगी पाटील यांच्या प्रचारात उतरून तांबेंना बोल सुनावले. पण इतर नेत्यांनी ही टीका टाळली. युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा तरुण चेहरा म्हणून सत्यजीत यांची सर्वच पक्षांतील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहे. त्याचाही त्यांना उपयोग होताना दिसत आहे. या तुलनेत शुभांगी पाटील यांच्यासाठी इतर कोणी बड्या नेत्यांनी थेट मैदानात उतरून प्रचाराचे मैदान गाजवले नाही. येत्या ३० जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सत्यजीत तांबे हे सोशल मिडियात हिट असलेले नेते आहेत. कंम्फर्ट झोन सोडा, धाडस करा, असे आवाहन ते आपल्या भाषणातून तरुणाईला करत असतात. आता खुद्द त्यांनीच कम्फर्ट झोन सोडला आहे. त्यांच्या या धाडसाची राज्यात चर्चा झाली खरी. आता ३० तारखेच्या परीक्षेवर त्यांच्या राजकीय करीअरची पुढील दिशा ठरणार आहे.
याबाबत Letsupp शी बोलताना तांबे म्हणाले की माझ्या राजकीय भूमिका स्पष्ट आहेत. त्या योग्य वेळी मी मांडणार आहे. मतदारांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता कोणात आहे, याची जाणीव मतदारांना आहे. वडिलांनी गेल्या अनेक वर्षांत ज्या पद्धतीने हा मतदारसंघ बांधला त्याचा मला उपयोगच होत आहे. पण आश्वासक चेहरा म्हणूनही मला साथ मिळत आहे. प्रचारात त्याचे प्रतिबिंब उमटले. आगामी काळात पदवीधरांचे प्रश्न असोत की सर्वसामान्य जनतेच्या समस्या असोत त्या सोडविण्यासाठी कोण सक्षम आहे, याची जाणीव मतदारसंघात आहे. त्यामुळे माझ्या विजयाबाबत मी निश्चिंत आहे. गेली वीस वर्षे संघटनेत काम केले आहे. हजारो युवकांशी संपर्क आहे. नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यामुळे माझ्याविषयी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खात्री आहे. त्यांचा हा विश्वासच मला निवडणुकीत उपयोगी पडणार आहे.