कृषिमंत्रिपदाचा राज्यातील नेत्यांना धसका; अनेकांचे राजकीय करिअर गडगडले…

Agriculture Minister: कधी शेतात भरपूर पीक येतं. तर कधी पावसाअभावी रोगराईने पीकाचे नुकसान होते. पीक न आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यातून ते कर्जबाजारी होतात. शेतकरी आत्महत्या, नापिकी या विषयावर चर्चा होते. तशीच कृषी खात्यांच्या मंत्र्यांची चर्चा होते. शेतकऱ्यांसारखी वाईट त्यांची परिस्थिती नसते. ते अडकतात कृषिखात्यातील भ्रष्टाचारात. कधी-कधी त्यांच्या वागण्यांमुळे त्यांना कृषिमंत्रिपदही सोडावे लागते. ते पुन्हा मंत्री होत नाहीत. तर कधी आमदारकीलाच हात धुवून बसावे लागते. वादामुळे कृषिमंत्रिपद गमवावे लागलेल्या माणिकराव कोकाटेंमुळे (Manikrao Kokate) पुन्हा एकदा कुणाला कशामुळे कृषिमंत्रीपद (Agriculture Minister) गमवावे लागले याची राजकीय चर्चा सुरू आहे.
अण्णा हजारेंमुळे शशिकांत सुतारांचे मंत्रिपद गेले
1995 साली राज्यात शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता आली होती. तेव्हा पुण्यातील शिवाजी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार शशिकांत सुतार यांच्याकडे कृषिमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केले होते. त्यामुळे सुतार यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. पण त्यानंतर काहीच दिवसात काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले राधाकृष्ण विखे पाटील हे कृषिमंत्री झाले. हे जुनं प्रकरण आहे. परंतु 2014 पासून तर जवळजवळ सर्वच कृषिमंत्रीही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
गोविंदराव आदिक परत मंत्री झाले नाहीत
सध्याचे भाजपचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांचे वडिल रणजित देशमुख हे विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री होते. त्यावेळी रणजित देशमुख व विलासराव देशमुख यांचे संबंध बिघडले होते. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात गोविंदराव आदिक कृषिमंत्री होते0. त्यानंतर
मात्र पुन्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
एकनाथ खडसे तर थेट पक्षातून बाहेर
2014 ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीसह तब्बल अकरा खाते देण्यात आले होते. परंतु 2016 मध्ये भोसरीतील जावयाच्या जमीन खरेदी प्रकरणात खडसेही अडकले. 2016 मध्ये त्यांना सर्वच मंत्रिपद गमावावे लागले. त्यानंतर मात्र खडसे हे भाजपमधून हळूहळू साईडलाइन झाले. त्यातून थेट ते पक्षातून बाहेर पडून शरद पवार यांच्या बरोबर जावून विरोधी बाकावर गेले.
भाऊसाहेब फुंडकरांचे निधन, अनिल बोंडे पराभूत
खडसे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर भाजपने ज्येष्ठ नेते पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या गळ्यात कृषिमंत्रिपद गेले. सुमारे दोन वर्षे हे मंत्रिपद त्यांच्याकडे होते. मंत्रिपदावर असतानाच त्यांचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर अवघ्या चार महिन्यासाठी डॉ. अनिल बोंडे हे कृषिमंत्री आणि अणरावतीचे पालकमंत्री झाले. चार महिन्यात ते मंत्री म्हणून काही करिश्मा करू शकले नाहीत. त्याचा फटका पुढच्या निवडणुकीत त्यांना बसला. 2019 ला देवेंद्र भुयार यांनी डॉ. अनिल बोंडे यांचा मंत्री असताना पराभव केला. पुढे अनिल बोंडे यांना भाजपने राज्यसभेवर घेत त्यांचे पुनवर्सन केले.
दादा भुसे ते अब्दुल सत्तार…
2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात मालेगावचे दादा भुसे हे कृषिमंत्री झाले. ते जास्त वादात अडकले नाहीत. परंतु एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांना 2022 मध्ये दुय्यम खाते मिळाले. तर युतीमध्ये अब्दुल सत्तारांना मोठी लॉटरी लागली. मराठवाड्यात कृषिमंत्रीपद गेले. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री झाले. परंतु ते ही वादात अडकले. सिल्लोडमधील कृषी महोत्सवासाठी देणगी म्हणून पंधरा कोटी रुपये जमा केल्याप्रकरण त्यांना विरोधकांनी घेरले. त्याच काळात टीएटी परीक्षा घोटाळा उघडकीस आला. त्यात अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींचे गुण वाढविल्याचे आले समोर आले. तर त्यांनी सुप्रिया सुळेंविरुद्ध अपशब्द वापरले. त्यामुळे त्यांच्याकडून कृषिखातं काढून घेण्यात आले. पुढे 2025 ला महायुतीची सत्ता येऊनही मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू मिळाले.
धनंजय मुंडेंचे मंत्रिपदही गेले
पुढे अजित पवार हे सत्तेत आले आणि महायुती अस्तित्वात आली. धनंजय मुंडेंना महत्त्वाचे कृषिखाते मिळाले. परंतु कृषिखात्यातील डीबीटी योजनेमुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पीक विमामध्ये घोटाळा उघडकीस आला. बीडमध्ये बोगस पिक विमा आढळून आले. त्यामुळे धनंजय मुंडेंना विरोधकांनी घेरले. पुन्हा महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद मिळाले. परंतु बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आढळला. मुंडेंचा सर्व कारभार हा वाल्मिक कराडकडे होता. सरकारवरच दबाव आल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. त्यांचे मंत्रिमंडळातील कमबॅकही अडचणीत आहे.
माणिकराव कोकाटेंनी हाताने धोंडा पाडून घेतला
अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंवर विश्वास ठेवत त्यांच्यावर कृषिखात्याची जबाबदारी दिली. पण ते अनेकदा वादात अडकले. सरकारी अनुदानाचा वापर शेतकरी लग्न, साखरपुड्यासाठी खर्च करतात. पंचनामे काय ढेकळाचे करायचे का ? मी ओसाड गावाचा पाटील असे ते म्हणत होते. त्यामुळे ते टीकेची धनी ठरले. पण विधिमंडळात मोबाइलवर रमी गेम खेळताना माणिकराव कोकाटे हे सापडले. त्यामुळे त्यांना कृषिमंत्रीपद सोडावे लागले. पण क्रीडा व युवक कल्याण खाते मिळाल्याने त्यांची नाचक्की टळली.
राधाकृष्ण विखे व थोरात हे लकी पण…
तसं पाहिलं तर कृषिमंत्री सांभाळणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे दोन नेते काहीशी लकी आहेत. कारण राधाकृष्ण विखे हे दोनदा कृषिमंत्री राहिले आहेत. ते भाजपमध्ये सध्या जलसंपदामंत्री आहेत. तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे तब्बल सहा वर्षे कृषी खाते होते. त्यानंतर ते महसूलमंत्रीही झाले. पण मागील विधानसभेतही ते पराभूत झाले.
महसूल मंत्री, महिला बालकल्याण, आरोग्य खात्यानंतर हे कृषिखातेही सर्वच अर्थाने महत्त्वाचे आहे. परंतु काही अपवाद वगळता कृषिमंत्र्यांनी या खात्याची अब्रू घालवलीय. त्यात शेतीची समस्या मोठी आहे. त्यामुळे अनेक आमदारांना हे खाते नको असते. कृषिखाते आणि ते खाते सांभाळणारे मंत्र्यांबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट सांगा.