Ajit Pawar : ९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले मंत्रिमंडळाचा विस्तार नाही
हिंगोली: “९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हिंगोली (Hingoli) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?” असा प्रश्नही अजित पवार यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “गेल्या सात महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. सगळ्यांना सांगितले जाते तुम्हाला मंत्री करतो. त्यांच्या घरच्यांनी सूट शिवले. फार गळा आवळायची वेळ आली पण मंत्रीपद काही मिळेना” अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही
राज्य सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाहीत का? असा प्रश्नही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. मंत्रिमंडळात २० मंत्री आहेत. त्यात एखादी महिला मंत्री केली असती तर काही बिघडले असते का? फक्त म्हणता महिलांना संधी देऊ. पण कधी देणार? असंही ते यावेळी म्हणाले.
गायीला मिठ्या कशा मारायच्या ?
फेब्रुवारी महिन्यात विविध डे असतात. मात्र केंद्राच्या पशुसंवर्धन खात्याने ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचा आदेश काढला. गायीला मिठया कशा मारायच्या, त्यांना चारा द्यायचा, गोंजाराचे असते. या खात्याचे डोके फिरले काय असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.