अजितदादा, तटकरेंनी आपल्यापुरतं पाहिलं… पालकमंत्रीपदावरून नाराजीचा धुरळा…
Ajit Pawar and Sunil Tatkare Guardian Minister महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून दररोज नाराजीच्या नव्या अंकाचा पडदा उघडतो आहे. कलाकार तेच पण नाराजीचे विषय वेगळे, असे सध्या सुरू आहे. शपथविधीपासून प्रत्येकवेळी महायुतीच्या सरकारला एक पाऊल मागे घेऊनच काम करावे लागताना दिसत आहे. कोणताही निर्णय धडपणे होताना दिसत नाही. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यापासून तर या नाट्याचे महानाट्य झाले आहे. आधीच शासनाला रायगड आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीलाच थेट स्थगिती देण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्वच मंत्री पालकमंत्रीपदावरून नाराज असल्याचे दिसून येत आहे. आणि हे सगळे कधी होत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेलेले असताना…
आधीच पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच असल्याने या निवडीला वेळ लागत गेला. प्रजासत्ताक दिनाला त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. आता प्रजासत्ताक दिन तोंडावर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्र्यांचा निर्णय घेणे अपरिहार्य झाले होते. कारण जर प्रजासत्ताक दिनापर्यंतही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली नसती तर बहुमतात असलेल्या सरकारची आणि महायुतीची नाचक्की झाली असती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असता. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण पालकमंत्री निवड झाली आणि त्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत होत असलेली धुसफुस चव्हाट्यावर आली.
रायगड जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शिवसेनेचे ती आणि भाजपचे तीन आमदार आहेत. त्याच जोरावर रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असे भरतशेठ गोगावले अगदी ठासून सांगत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला तसा शब्द दिला आहे, असेही त्यांनी सांगितले होते. पण जेव्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यावेळी गोगावले यांचा पत्ता कट झाल्याचे दिसले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जिल्ह्यात एकच आमदार असलेल्या पक्षाला म्हणजे अदिती तटकरे यांना देण्यात आले.
इथेच नाराजीची पहिली ठिणगी पडली. एकतर गोगावले यांना मागच्या सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आता मंत्रीपद मिळाले आहे तर पालकमंत्री आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा त्यांचा दावा सुरुवातीपासून होता. पण त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा वयाने अगदी कमी असलेल्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने त्यांचा पारा चढला. त्याचवेळी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तर आपला राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरेंना सहन करणार नाही, अशी ठाम भूमिकाच घेतली.
नाशिकमध्येही अशीच पालकमंत्रीपदावरून नाराजी उफाळून आली आहे. नाशिकमध्ये एकूण आमदार आहेत १५. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन आणि एमआयएमचा १ आमदार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांनी सुरुवातीपासूनच फिल्डिंग लावली होती. त्यांच्या जोडीला सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनीही पालकमंत्रीची पदाची स्वप्न बघितली होती. यातही भुसे किंवा कोकाटे यांचीच वर्णी लागू शकते हे जवळपास फिक्स मानले जात होते.
पण झाले वेगळेच. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा भाजपच्या गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आली. गिरीष महाजन हे जळगावमधील जामनेरचे आमदार आहेत. पण त्यांना नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात आले. नाशिकमधील आगामी कुंभमेळा, त्यासाठीची तयारी आणि करोडो रुपयांचे बजेट यामुळे यंदा इथल्या पालकमंत्रीपदाला नेहमीपेक्षा अधिक महत्व प्राप्त झाले होते. इथेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार कमालीचे नाराज झाले. पण केवळ रायगड आणि नाशिकच नाही तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधील काही अपवाद वगळता जवळपास सर्वच मंत्री नाराज झाले आहेत.
भाजपच्या 20 पैकी केवळ सात, शिवसेनेच्या 12 पैकी सात मंत्र्यांनाच स्वजिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं आहे. यातही राष्ट्रवादीचे मंत्री कमालीचे नाराज आहेत. पुणे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले. तटकरे यांनी रायगड राखले. राष्ट्रवादीच्या उर्वरित आठ मंत्र्यांना स्वजिल्हे मिळालेले नाहीत. त्यामुळे मतदारसंघात कधी काम करायचं, मुंबईत कधी जायचं आणि पालकमंत्रिपद मिळालेल्या जिल्ह्यांचा कारभार कसा करायचा, असा प्रश्न मंत्र्यांना पडला आहे. अजित पवार यांनी स्वत: पुरता आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरता विचार केला. पण बाकीच्या मंत्र्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार? असा सूर या आठही मंत्र्यांमधून निघत आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना 625 किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालं आहे. नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना 195 किमीवरचा नंदूरबार आणि नरहरी झिरवाळ यांना 445 किमीवरचा हिंगोली जिल्हा दिला आहे. साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना 440 किमीवरचा बुलढाणा तर शिवेंद्रराजे भोसले यांना 350 किलोमीटरवरचा लातूर जिल्हा मिळाला आहे. त्याचवेळी लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना 636 किमीवरचा गोंदिया जिल्हा दिला गेला आहे. भुसावळच्या संजय सावकारे यांना 600 किलोमिटर लांब भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. ठाण्याच्या प्रताप सरनाईक यांनाही 550 किलोमिटवरील धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे.
एकूणच या नाराजीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उपाय शोधतात? की हे नाराजांचे ओझे घेऊनच सरकार पुढे चालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे? तुम्हाला काय वाटते? मंत्र्यांना जवळचे जिल्हे मिळायला हवेत की महाराष्ट्रभर काम करण्याचा अनुभव गाठीशी पाहिजे? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा