अजितदादांचा भाजपला धक्का; विरोध असतानाही नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर
Ajit Pawar NCP Candidate Nawab Malik File Nomination : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक (NCP) यांना उमेदवारी दिलीय. भाजप नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास सतत विरोध करत होते. तरीदेखील अजित पवारांनी त्यांना रिंगणात उतरवलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे जेष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
भारतीय जनता पक्षाच्या राजकीय दबावाला न जुमानता अजित पवार यांनी मुंबईत नवाब मलिक यांना मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली (Assembly Election) आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या शेवटच्या दिवशी नवाब मलिक यांना मानखुर्द जागेसाठी राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. नवाब मलिक आता या जागेवरून महायुतीचे उमेदवार आहेत. याकडे मोठी राजकीय खेळी म्हणून पाहिलं जातंय.
Video: चष्मा काढला अन् डोळे पुसले; शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल, व्हिडिओ व्हायरल
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले की, अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या अर्जावर मी माझे नाव दाखल केले आहे. राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज परत आल्यास मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. नवाब मलिक हे अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना तिकीट न देण्यासाठी भाजपकडून सातत्याने दबाव आणला जात होता. दरम्यान नवाब मलिक यांनी मानखुर्दमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; महायुती अन् मविआ बंडखोरी कशी रोखणार?
नवाब मलिक दाऊद इब्राहिम आणि त्याच्याशी संबंधित लोकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते. या आरोपांतून त्यांना यावर्षी जामीन मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक शरद पवारांची साथ सोडून अजित यांच्यासोबत आले. नवाब मलिक हे मुस्लिमांचे मोठे नेते मानले जातात. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षही राहिले आहेत. मानखुर्दमधील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेऊन पक्षाने येथून मुस्लिम उमेदवार उभे केला असल्याची चर्चा देखील सुरू आहे.