Ashok Chavan यांची मागणी भाजपने झटक्यात पूर्ण केली आणि…

  • Written By: Published:
Ashok Chavan यांची मागणी भाजपने झटक्यात पूर्ण केली आणि…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच चव्हाणांची मागणी भाजपाचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पूर्ण केली आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले होते. या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी दानवेंकडे (Raosaheb Danve) काही मागण्या केल्या होत्या. मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वेच्या डब्यांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली असून त्या ठिकाणी नवीन डबे बसवण्यात यावे, अशा स्वरूपाची मागणी चव्हाणांनी केली होती. या मागणीची अवघ्या दीड महिन्यातच दखल घेत रावसाहेब दानवे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातून धावणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस या रेल्वेचे डबे बदलण्यात येणार आहेत. येत्या 13 फेब्रुवारी पासून देवगिरी एक्सप्रेस चे जुने डबे बदलून त्याऐवजी सर्व सुखसोयी असलेले एलएचबी डबे बसवण्यात येणार आहेत.

या निर्णयाची माहिती अशोक चव्हाण यांनी ट्विट करत दिली आहे. हा निर्णयाची माहिती मला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फोन करून सांगितल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी दानवेंचे आभार देखील मानले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हा विभाग दक्षिण मध्यतून वगळून मध्य रेल्वेला जोडण्यात यावा अशीही आमची मागणी आहे, लवकरच आपण तो निर्णय घ्यावा, अशी विनंती देखील त्यांनी दानवेंकडे केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी चव्हाण यांच्या मतदारसंघात मोठ्या विकास कामांना मंजुरी दिली होती. त्यातच आता चव्हाण यांची आणखी एक मागणी भाजप नेत्याने पूर्ण केल्याने पुन्हा एकदा चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube