बावनकुळे बोलून गेले… पण पोटात गोळा भानगिरेंच्या आला!

  • Written By: Published:
बावनकुळे बोलून गेले… पण पोटात गोळा भानगिरेंच्या आला!

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 240 जागांवर निवडणूक लढविणार असून शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य पक्षाच्या प्रभारींसमोर बोलताना केल्याने आता त्यावर वेगळेच वाद सुरू झाले आहेत. त्यांनी हे विधान नंतर मागे घेतले असले तरी व्हायचा तो घोळ झाला आहे. भाजपच्या मनात काय सुरू आहे, हे या निमित्ताने उघड झाले. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर अपेक्षेप्रमाणे आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. उद्धव ठाकरे गटाच्या मंडळींनी तर शिंदे गटाची टर उडवली.

या साऱ्या वक्तव्यांचा मतदारसंघनिहाय स्थानिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटाची ताकद भाजपपेक्षा फारच कमी आहे. तसेच या गटाचा फारसा फायदा होत नाही, असे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिसून आले. त्यामुळेच शिंदे गट सध्या बॅकफूटवर गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या 40 विद्यमान आमदारांना काही अपक्षांना भाजप-शिवसेना युतीत संधी मिळेल, असेच बावनकुळे यांनी सुचविले आहे. पण शिंदेंनी काही ठिकाणी ठाकरेंसोबत असलेल्या पण आमदार किंवा खासदार नसलेल्या अनेक नेत्यांना सोबत घेतले आहे. या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळणार की नाही, हाच आता प्रश्न आहे.

आठवलेंनी केली लोकसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी, भाजप करणार का? विचार 

याचे पुण्यातील उदाहरण हडपसर विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार योगेश टिळेकर हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे देखील याच मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे. शिंदे शिवसेना पुण्यातील एखाद्या जागेवर हक्क सांगू शकेल, असा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. तेथेही समजा संधी मिळाली नाही तर 2019 प्रमाणे पुण्यात सर्वत्र भाजपचेच उमेदवार राहतील. शिंदेंसोबत आलेल्या पुण्यातील कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत संधीच मिळणार नसल्याचे अर्थ बावनकुळे यांच्या वक्तव्यातून निघत असलेल्या भानगिरे यांच्यासाठी हा धक्काच मानला जात आहे. त्यामुळे लोकल पातळीवर असे अनेक वाद पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube