आवताडे, पाटील की भालके… ‘विठ्ठल’ कोणाला पावणार? परिचारक गेम फिरवणार?
मतदारसंघात एखादे मोठे देवस्थान असेल तर त्या मतदारसंघाला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त होते. देशभरातली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल-रुक्मिणी ही पंढरपूरची (Pandharpur Assembly Constituency) ओळख. हाच मतदारसंघ आपल्याकडे कसा राखता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असतात. पण या मतदारसंघातून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली आहे. भारत भालके (Bharat Bhalake) यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणूक झाली आणि वेगळी राजकीय समीकरणे उद्यास आली.
या समिकरणात प्रथमच भाजपचे (BJP) कमळ फुलले. समाधान अवताडे (Samadhan Autade) आमदार झाले. यंदा लोकसभा निवडणुकीत मात्र इथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भक्कम आघाडी मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. या स्थितीत यंदा समाधान आवताडे यांच्यासमोर कुणाचे आव्हान असणार आहे? शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार? की पवार पुन्हा भगिरथ भालके यांच्यावर डाव खेळणार? (Bhagirath Bhalke of NCP’s Sharad Chandra Pawar’s party will fight against BJP’s Samadhan Avatade in Pandharpur assembly constituency.)
याच घडामोडींचा आढावा घेऊया, लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून पाहुया….
पंढरपूर मतदारसंघातून पहिले आमदार झाले ते काँग्रेसचे औदुंबर कोंडिबा पाटील. 1962, 1967, 1972 आणि 1978 असे सलग चार टर्म त्यांनी विजय मिळवला. पण 1980 मध्ये अर्स काँग्रेसच्या औदुंबर पाटील यांचा आय काँग्रेसच्या पांडुरंग भानुदास डिंगरे यांनी पराभव केला. मात्र पुढच्याच निवडणुकीपासून ‘मालक’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुधाकरपंत परिचारक यांचा काळ सुरु झाला. खरंतर परिचारक यांनी 1978 मध्ये जनता पक्षातून निवडणूक लढवली होती. पण चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र 1985 मध्ये औदुंबर पाटील यांचे कट्टर समर्थक यशवंत पाटील यांचा पराभव करत परिचारक काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार झाले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
1990 च्या निवडणुकीत तर परिचारक यांच्यासमोर कोणी प्रबळ विरोधकच नव्हता. ते तब्बल 80 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. 1995 मध्ये मात्र औदुंबर पाटील यांचा मुलगा राजाभाऊ पाटील यांनी परिचारक यांना तगडं आव्हान दिलं. पण पंढरपूरमध्ये परिचारक पर्व दिवसागणिक वाढतच होते. 1999 मध्ये परिचारक काँग्रेससोडून शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. 1999 आणि 2004 असे दोन टर्म ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले.
2008 मतदारसंघ पुनर्रचनेने पंढरपूर तालुक्याचे राजकारण 180 अंशाने बदलले. एक तालुका चार मतदारसंघात विभागला गेला. पंढरपूर शहरासह तालुक्यातील 22 गावे आणि मंगळवेढा तालुका यांचा मिळून पंढरपूर-मंगळवेढा हा नवा मतदारसंघ तयार झाला. तर तालुक्यातील काही गावे मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली, काही गावे माढा आणि काही सांगोला मतदारसंघाला जोडली गेली. याच पुनर्रचनेत माळशिरस मतदारसंघ ‘एससी’ राखीव झाला. त्यामुळे विजयसिंह मोहिते दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांनी पंढरपूर मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला. परिचारक यांनीही मोहिते यांच्यासाठी मतदारसंघ सोडला. पण स्वाभिमानी पक्षाच्या भारत भालके यांनी मोहितेंना पराभवचा धक्का दिला. भालके जायंट किलर म्हणून पुढे आले.
Ground Zero : शहाजीबापूंसाठी यंदा काहीच ओके नाही! लाल वादळ वचपा काढणार?
भालके हे तीन टर्म आमदार राहिले. पण तिन्ही वेळी पक्ष मात्र वेगळा होता. 2014 मध्ये भालके काँग्रेसमध्ये गेले. तर सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक स्वाभिमानीकडून मैदानात उतरले. समाधान अवताडे हे शिवसेनेकडून लढले. या तिरंगी लढतीत भालके यांनी परिचारक यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला. भालके यांना 91 हजार 863 मते मिळाली होती. तर परिचारक यांना 82 हजार 950 मते मिळाली होती. अवताडे यांना 40 हजार 910 मते मिळाली होती. त्यानंतर प्रशांत पारिचारक हे भाजपच्या पाठिंब्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर आमदार झाले. पण सैनिकांच्या पत्नींबाबत त्यांनी अपशब्द वापरले होते. त्यामुळे ते बॅकफूटला गेले, त्यावेळी भाजपचीही चांगलीच कोंडी झाली होती.
2019 मध्ये भारत भालके यांनी काँग्रेस सोडली आणि ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर रिंगणात उतरले. तर 83 व्या वर्षी सुधाकरपंत परिचारक भाजपमध्ये गेले आणि त्यांनी तिकीटही मिळवले. समाधान अवताडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. तिहेरी लढतीमध्ये भारत भालके तिसऱ्यांदा आमदार झाले. भालके यांना 89 हजार 787, परिचारक यांना 76 हजार 426 मते मिळाली. अपक्ष लढणाऱ्या अवताडे यांनी तब्बल 54 हजार 124 मते घेतली होती. श्री. विठ्ठल सहकारी कारखाना आणि आमदार म्हणून भालके यांनी आपले राजकारण पक्के केले होते. याच कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. पुढे अध्यक्ष होत त्यांनी कारखाना अनेक वर्षे ताब्यात ठेवला होता.
पण 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पुत्र भगिरथ यांना उमेदवारी दिली. तर अवताडे भाजपमध्ये गेले. तिहेरी लढतीत मतविभाजनाचा फायदा भारत भालके यांना होत होता. पण परिचारक आणि अवताडे राजकीय वैर विसरून एकत्र आले. अटीतटीच्या लढतीत अवताडेंनी भालकेंचा सुमारे चार हजार मतांनी पराभव केला. अवताडेंना एक लाख 09 हजार 450 मते, तर भालके यांना एक लाख 05 हजार 717 मते मिळाली. पंढरपूर मतदारसंघावर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला.
मोहिते पाटील इरेला पेटलेत; राम सातपुतेंचं पार्सल बीडला परत जाणार?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र बघायला मिळाले. या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. प्रणिती शिंदे यांना तब्बल एक लाख 24 हजार 711 मते मिळाली. तर राम सातपुते यांना 79 हजार 288 मते मिळाली. शिंदे यांना तब्बल 44 हजारांची मताधिक्य मिळाले. लोकसभेला गणित बदलल्याने आता विधानसभेला रस्सीखेच बघायला मिळत आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे जाणार हे स्पष्ट आहे. पण उमेदवार कोण असणार हा प्रश्न आहे. समाधान अवताडे हे दुसऱ्या विजयासाठी तयारी करत आहेत. तर आमदारकीपासून दूर असलेले प्रशांत परिचारकही हे पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हेही विधानसभेची तयारी करत आहेत.
अभिजीत पाटील हे पंढरपूर आणि माढा या दोन मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची शक्यता आहे. एका सभेत बोलताना मी पंढरपूरमधूनच लढणार असे त्यांनी जाहीर केले आहे. पण त्यांची तयारी दोन्ही मतदारसंघात सुर आहे. त्यांचा पक्ष मात्र अद्याप निश्चित नाही. लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील हे आधी शरद पवार यांच्यासोबत होते. ते पवार यांच्यासोबत व्यासपीठावर दिसत होते. पण विठ्ठल कारखान्यावर कारवाई झाली. गोडाऊन सील करण्यात आले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. ही भेट होताच कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतर पाटील यांनीही माढा आणि सोलापूरमधील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पण दोन्ही उमेदवार पराभूत झाले.
इकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे. राजकीय तडजोडीत भगिरथ भालके राष्ट्रवादीची साथ सोडून बीआरएसमध्ये गेले होते. बीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांना मतदारसंघात आणून भालके यांनी शक्तीप्रदर्शनही केले. पण तेलंगणामध्ये बीआरएसची सत्ता गेली आणि बीआरएस लयास लागले. तिथे भवितव्य नसल्याने ते पुन्हा शरद पवार यांना भेटले. लोकसभेला त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेतून ते आमदार अवताडे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. त्यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला नाही. परंतु ते इच्छुक आहेत. याशिवाय रतनचंद शहा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. प्रशांत परिचारक हेही शरद पवार यांना भेटलेले असून तेही तिकीट मागत असल्याची माहिती आहे.
एकाला तिकीट दिले तर दुसरा अपक्ष रिंगणात उतरले हा पंढरपूरचा इतिहास आहे. एकास एक लढत परिचारक किंवा भाजपला सोपी जाते. तर तिरंगी लढत भालके यांना सोपे जाते. पण यंदा इच्छुकांची संख्या बघता या मतदारसंघात चौरंगी लढत होऊ शकते. यात समाधान अवताडे, भगिरथ भालके, प्रशांत परिचारक आणि अभिजीत पाटील हे चार चेहरे प्रमुख आहेत. आता यात नेमकी कोणा-कोणाला उमेदवारी मिळणार? आणि कोण बंडखोरी करुन कुणाचा गेम करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.