मनोहर जोशी हा ब्राम्हण मुख्यमंत्री नको म्हणून राणेंनी घेतल्या 45 आमदारांच्या सह्या; भास्कर जाधवांचा दावा
Bhaskar Jadhav on Narayan Rane : शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र माने (Ravindra Mane) यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उबाठाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल दोन मोठे किस्से सांगितले. नारायण राणे यांनी मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मुख्यमंत्री बदला, यासाठी मराठा आमदारांच्या सह्यांचे पत्र घेतले होते, असा दावा जाधव यांनी केला.
भास्कर जाधव म्हणाले, राणेंनी मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी 45 आमदारांच्या सह्या घेतल्या होत्या. नारायण राणे आणि माझे अत्यंत सख्यं होतं. मात्र मनोहर जोशी यांना मंत्रीपदावरून काढायचं की, नाही हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठरवतील. ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून मी सही करणार नाही, असं रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यासमोर सांगणार मी एकमेव होतो, असं जाधव म्हणाले.
‘थोडा वेळ जाऊ द्या, साहेब राजकीय..,’; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान
दोघांनाही मंत्री करा
जाधव म्हणाले की, मी सांगितलं की रवींद्र माने यांना पण ठेवा. आणि रामदास कदम यांनाही मंत्री करा. दोघांना मंत्री करा. आमच्या जिल्ह्यात दोन मंत्रिपद द्या, असं सांगणार असाल तर मी तुमच्या बरोबर येतो आणि सही करतो. हे सांगणार मी एकमेव होतो, याची आठवणही त्यांनी रवींद्र माने यांना करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी रवींद्र माने यांना मंत्री केल्यावर रामदास कदम यांनी सर्व आमदारांना एकत्र करून माने यांना काढा व मला मंत्री करा, यासाठी सही करायला सांगितलं. अनेक आमदारांनी सह्या केल्या होत्या, पण मी सही केली नाही.
भास्कर जाधव काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, हे सरकार विरोधी पक्षातील लुजदुवे कच्चे दुवे हेरण्यावर, त्यांच्यातील काहींच्या झालेल्या जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या चुका शोधण्याचे काम करते. त्यानंतर त्यांच्यावर केंद्रीय एजन्सींना पाठीमागे लावून त्यांना आपल्या पक्षात घेरण्याचे काम करत आहेत. या सरकारचे काम फक्त पक्ष फोडण्याचे आहे. हा तुमच्या नैतिकतेचा पराभव असल्याची घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली होती.