Loksabha: 2024साठी रणजितसिंह निंबाळकरांनी ठोकला शड्डू; रामराजेंना दिले चॅलेंज
Ranajit Singh Nimbalkar : माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भूमिका बदलण्यात पवारांचा हातखंडा राहिला आहे, असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला आहे. तसेच यावेळी त्यांनी माढ्याच्या लोकसभा निवडणुकीवर देखील भाष्य केले. ( Ranjait Singh Nimbalkar Vs Ramraje Nimbalkar ) माझ्याविरोधात निंबाळकरांनी उभं राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
2024 साली माढा लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागे एका सभेत याचे संकेतही दिले होते. त्यावर रणजित सिंह निंबाळकरांनी उत्तर दिले. 2019 साली माझ्या विरोधात शरद पवार उभे राहणार होते. तेव्हा मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यामुळे यावेळी कोणीही उभं रहावं. मला फरक पडत नाही. तसेच माझी इच्छा आहे की निंबाळकरांनी माझ्याविरोधात उभं रहावं, असे म्हणत त्यांनी थेट रामराजेंना आव्हान दिले आहे.
अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप
दरम्यान, रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर या दोघांमध्ये सातत्याने संघर्ष दिसून येत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असतात. काही महिन्यांपूर्वी रामराजे निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याने सतत हेलपाटे मारतायत, मात्र देवेंद्र फडणवीसांनी नकार दिल्यानंतर २ दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतली असल्याचा दावा रणजितसिंह निंबाळकर यांनी केला होता.
तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७५व्या वाढदिवसाला जयंत पाटील यांनी रामराजेंनी आता दिल्लीत जायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारकडून करायचे तेवढं काम त्यांनी केलं आहे. आता उरलेले केंद्रात जाऊन केले पाहिजे, असे पाटील म्हणाले होते. त्यामुळे आता रामराजे निंबाळकर हे २०२४ साली माढ्यातून लोकसभेची निवडणुक लढणार असे बोलले जात आहे.
दरम्यान, यावेळी रणजित निंबाळकरांनी शरद पवारांदेखली निशाणा साधला. शरद पवारांची भूमिका दर पाच वर्षानंतर वगेळी असते. त्यामुळे 2024 नंतर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना दिसेल. काँग्रेसमध्ये राहून देखील त्यांनी विविध भूमिका मांडल्या. सातत्याने भूमिक बदलणे हा शरद पवारांचा हातखंडा राहिलेला आहे.
यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरदेखील भाष्य केले. मराठी मध्ये एक म्हण आहे की, खुंटा हलवून बळकट करणे, त्याप्रकारे त्यांनी खुंटा हलवून बळकट केला आहे. त्यांनी राजीनाम्याचा एक प्रयोग केला आणि पवार हे वेगवेगळे प्रयोग करण्यात माहिर आहे. तसेच अजित पवार हे धाडसी नेतृत्व असून आज नाही तर उद्या ते राजकारणात स्पेस घेतील.