Nitesh Rane : ‘सुधाकर बडगुजर सिर्फ झांकी है, संजय राऊत अभी’..; नितेश राणेंचं चॅलेंज काय?
Nitesh Rane Replies Sanjay Raut :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ताबरोबरील पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर आता ही पार्टी उजेडात आणणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. सुधाकर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण आहे हे आज संजय राऊतने दाखवून दिले. सुधाकर बडगुजर तो सिर्फ झांकी है, संजय राऊत अंदर जाना अभी बाकी है, अशा शब्दांत राणे यांनी आव्हान दिले.
राणे पुढे म्हणाले, सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांची सकाळची पत्रकार परिषद. बाजूला उभ्या असलेल्या सुधाकर बडगुजरला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. आतापर्यंत बडगुजर म्हणत होते की सलीम कुत्ताला ओळखतही नाही. मी त्या पार्टीत गेलोच नाही. फोटो मॉर्फ केलेले आहेत. पण, काल तर संजय राऊतने सांगून टाकलं की तो एक अपघात होता. म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षपणे पार्टी झाल्याचं स्वीकारलं.
बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत पार्टी केल्याचा आरोप, बडगुजरांनी केला खुलासा, माझा सलीम कुत्ताशी संबंध..
आता भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवत आहेत काहीतरी पुरावा आधी द्या. बिनपुराव्याचं बोलण्याचं काम तर संजय राऊत नेहमीच करतो. आम्ही पुरावा दिला, व्हिडिओही दाखवले त्यानंतर आरोप केले. आता ती पार्टी भाजपाच्या पदाधिकाऱ्यानं आयोजित केली हे फोटो दाखवून होणार नाही. फोटो दाखवून बडगुजरच्या मागचा गॉड फादर कोण आज हे संजय राऊतांनी दाखवून दिलं. गृहराज्यमंत्री शिवसेनेकडं कधीच नव्हतं म्हणून थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपासा म्हणजे मग गृहराज्यमंत्रिपद कधी होतं हे नक्की तुम्हाला कळेल. सुधाकर बडगुजर तो सिर्फ झांकी है, संजय राऊत को अंदर जाना अभी बाकी है असे आव्हान राणे यांनी दिले.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. बावनकुळे यांचा मकाऊ येथील व्हिडिओ बडगुजर कुटुंबाने दिला म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजर यांनी दिलेला नाही. संघपरिवार विशेषतः नागपुरवाल्यांना हे चांगलं माहिती आहे की तो व्हिडिओ कसा आला, असा टोला राऊत यांनी लगावला.