Maharashtra Assembly by poll : कसबापेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

Maharashtra Assembly by poll : कसबापेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

पुणे : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या या दोन्ही आमदारांचे कर्करोगाशी सामना करताना निधन झाले होते.

केंद्रीय निवडणुक आयोगाने ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी तर मेघालय आणि नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे.त्याचबरोबर पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते.

त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. आजारी असूनही त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली होती.

मुक्ता टिळक यांच्यानंतर काही दिवसांतच भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तसेच महानगरपालिकेचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube