Satyajit Tambe : तांबेंच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल ? सामनातून काँग्रेसवर निशाणा
मुंबई : ‘नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत राहिली ते कॉंग्रेसच्या सुधीर तांबेंऐवजी ऐनवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित हे भाचे आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांची जिरवता येईल का ?’ असा प्लान कॉंग्रेस असावा असा सावाल आजच्या सामनाच्या अग्रलेखातून
उपस्थित करण्यात आला आहे.
सामनाच्या या अग्रलेखात आज राज्यातील पदवीधर निवडणुकांचा लेखाजोखा मांडण्यात आला. यावेळी ‘सगळयात जास्त वादात व गर्जत राहिली ती नाशिक पदवीधरांची निवडणूक. येथे काँग्रेसचे जुनेजाणते उमेदवार सुधीर तांबे यांनी घोळात घोळ घातला व ऐन वेळेस माघार घेऊन सत्यजीत तांबे या आपल्या चिरंजीवास अर्ज भरायला लावला. पिता की पुत्र हे आधीच ठरवायला हवे होते.’
‘मतदारसंघात तांबे व काँग्रेसने मतदारांची नोंदणी केली व कोणत्याही परिस्थितीत तांबे हेच जिंकणार होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीत हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता. झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता. पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव कदाचित असावा.’
‘त्यात किती तथ्य ते त्यांनाच माहीत, पण शेवटी ऐन वेळेस अपक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला व त्यांच्या विजयासाठी शर्थ करूनही सत्यजीत तांबे हे विजयी झाले. काँग्रेसचा मोठा गट तांबे यांच्या मागे उभा राहिला. राष्ट्रवादीही मनाने तांबे यांच्याबरोबर होती. मुख्य म्हणजे भाजपने येथे उमेदवारच उभा केला नाही व तांबे हे शेवटपर्यंत ‘मी काँग्रेसवालाच’ असे सांगत राहिले. तरीही नवख्या शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलीच टक्कर दिली.’ असा निशाणा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कॉंग्रेसवर साधण्यात आला आहे.