… तर कारवाई करु, CM फडणवीसांचा ‘त्या’ प्रकरणात आमदार संजय गायकवाडांना इशारा

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र पोलिसांबद्दल (Maharashtra Police) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे. तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत आमदार संजय गायकवाड यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही. वारंवार ते जर असं बोलत असतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेऊ असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर 2024 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस काम पाहणार असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. यावर देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, बावनकुळे मला 100 वर्षे मुख्यमंत्री ठेवतील पण राजकारणात रोल बदलत असतात आणि ते बदलले पाहिजे. कुणी फार काळ एकाच पदावर राहत नाही त्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली
माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल देखील माहिती दिली. जे पाकिस्तानी नागरिक व्हिसा घेऊन आले आहे त्यांची माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटली असून त्यांना नोटीसा देण्यात आले आहे. त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली असून त्यांना परत पाठवण्यात येणार आहे. व्हिसा घेऊन आलेल्यांना 48 तासांत देशाबाहेर काढायचे आहे आणि यासाठी पोलीस काम करत आहेत असं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चाहत्यांना धक्का, सोशल मीडिया स्टार मीशा अग्रवालने घेतला जगाचा निरोप, मृत्यूचे कारण अस्पष्ट
काय म्हणाले होते संजय गायकवाड ?
संजय गायकवाड यांच्या मुलाला एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. या विषयावर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की, माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावं लागेल. पोलीस काहीही करु शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळं पोलीस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सरकारने जर एखादी कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल. असं आमदार संजय गायकवाड म्हणाले होते.