सुशीलकुमार शिंदेंकडे मोठी जबाबदारी, ‘कर्नाटकचा मुख्यमंत्री फायनल करणार’
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. आता कर्नाटकचा नवीन मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यासाठी काँग्रेस सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय काँग्रेस नेते दीपक बावरिया आणि जितेंद्र सिंह यांची कर्नाटकसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) आघाडीवर आहेत. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कर्नाटक काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. अशा परिस्थितीत या दोघांपैकी एकाची निवड करणे काँग्रेससाठी कठीण काम ठरू शकते.
कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने आज (14 मे) संध्याकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले की, आज संध्याकाळी 6.30 वाजता बेंगळुरू येथील हॉटेल शांगरी-ला येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतून जो काही निर्णय होईल, त्यावर हायकमांडशी चर्चा केली जाईल. या प्रक्रियेनंतरच मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम निर्णय होणार आहे.
आदित्य ठाकरे दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या भेटीस, राजकीय चर्चांना उधाण
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. गांधी कुटुंबाच्या अतिशय विश्वासू म्हणून त्यांची दिल्लीत ओळख आहेत. आघाडी सरकारच्या काळात केंद्रीय गृहमंत्री तसेच राज्यपाल म्हणून देखील काम केलेले आहे. सध्या ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. 2019 ला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते.