Congress : थोरातांचा राजीनामा ते तांबेचे आरोप; नाना पटोलेंची स्वपक्षीयांकडूनच कोंडी

  • Written By: Published:
Congress : थोरातांचा राजीनामा ते तांबेचे आरोप; नाना पटोलेंची स्वपक्षीयांकडूनच कोंडी

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं त्यामुळे नाना पटोले हे खुशीत होते. पण दुसरीकडे त्याच वेळी नाना पटोले (Nana Patole) यांची काँग्रेसमधूनच कोंडी करण्यात येत आहे. आज बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर नाना पटोले यांची मोठी कोंडी झाली आहे. कदाचित नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीआधीच काँग्रेसमधीलच आशिष देशमुख यांनी पत्र लिहून नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सत्यजित तांबे प्रकरणानंतर सुनील केदार, विजय वडेट्टीवर आणि आता बाळासाहेब थोरात यांच्याकडून नाना पटोले यांच्या निर्णयावर प्रश्न उभे केले आहेत. त्यामुळे नाना पटोले यांची स्वपक्षातूनच कोंडी केली जात असल्याची चर्चा आहे.

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले (Nana Patole)यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांची तक्रार थेट पक्षाच्या हायकमांडकडे केली होती. त्यातच आता त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

सत्यजित तांबे यांचे आरोप

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानपरिषद निवडणुकीतला वाद हा तांबे-थोरात कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र करण्यात आल्याचे तांबे म्हणाले.

सत्यजीत तांबे यांनी खुलासा केला की त्यांना मुद्दामहून चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. आणि असा बनाव करण्यात आला मी बंडखोरी केली. मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे तेव्हा अपक्षच राहणार आहे. तर चुकीचा एबी फॉर्म देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालय जबाबदार आहे, त्यावर भारतीय काँग्रेस काही कारवाई करेल का हे पाहावे लागेल असं सत्यजीत तांबे म्हणाले.

प्रदेश कार्यकारिणीने खुलासा करावा, विजय वडेट्टीवार यांची भूमिका

सत्यजित तांबे यांनी जाहीर आरोप केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भूमिका मांडली, त्यावेळी ते म्हणाले की “सत्यजीत तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाती दखल घ्यावीच लागणार. पक्षाला आता कुठे चांगले दिवस येत आहेत. त्यात कुठे हे असं…! प्रदेश कार्यकरिणीने याचा खुलासा केला पाहिजे.”

त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल बोलताना “प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाबतीत हायकमांड निर्णय घेतील” असं सांगितलं

काँग्रेसने विचार करावा, सुधीर तांबे यांचा सल्ला

आज थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशी वेळ का यावी? याचा काँग्रेसने विचार करावा’ असा प्रश्न सुधीर तांबे यांनी केला आहे.

सुधीर तांबे म्हणाले की, “बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची काँग्रेसच्या विचारावर निष्ठा आहे. अशा व्यक्तीला असा निर्णय घेण्याची वेळ का यावी? याचा कुठेतरी गंभीर विचार व्हायला हवा.’

हेमलता पाटील यांचं सूचक ट्विट

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी सोमवारी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं: ‘आज सकाळी सकाळी फोन आला, “ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे?” आता काय उत्तर देऊ कप्पाळ?’

या ट्विटमधला विनोद सोडला तरी काँग्रेसमध्ये अंतर्गत मोठी धुसपूस सुरु असल्याच बोललं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube