देवेंद्र, दादा आणि सगळ्यांचाच आवाज एका फटक्यात बंद…

देवेंद्र, दादा आणि सगळ्यांचाच आवाज एका फटक्यात बंद…

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ध्वनी यंत्रणा बंद असल्याने जवळपास 55 मिनिटं सभागृह बंद राहिल्याचे दिसून आले. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, त्यांना वाट मोकळी करण्यासाठी कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणामुळे सभागृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांची वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. तर अशा पद्धतीने सभागृह बंद राहणे ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

एकदा दहा मिनिटे, दुसऱ्यांदा पंधरा मिनिटे आणि तहकूब झाल्यानंतर सभागृह पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. म्हणजे ध्वनी यंत्रणा बंद असल्याने एकूण 55 मिनिटं सभागृह बंद राहिले होते.

डिसीएम बोलत असतानाच ध्वनी यंत्रणा बंद पडली. मग सभागृह तहकुब झाले. मधल्या वेळेत डिसीएम अजित पवारांकडे पाहत म्हणाले, उद्यापासून प्रत्येकजण आपापला भोंगा घेऊन येऊ. यावेळी अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या आवाज इतका दमदार आहे की त्यांना माईकची गरजच नाही. अजित पवार म्हणाले, आहो आपला एकेक मिनिट महत्वाचा असतो. सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे असते. असा माईक बंद पडणे बरोबर नाही.

ज्येष्ठ सदस्य अशा खेळीमेळीत चर्चा करत असताना यावेळी अधिकारी वर्गाची मात्र धावपळ सुरू होती. तहकुबीची दहा मिनिटे झाल्यानंतरही ध्वनी यंत्रणा पूर्ववत न झाल्याने अधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube