सत्यजित तांबेंसाठी विखे लागले कामाला ? एका अपक्षाची माघार
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. यावेळी धनंजय जाधव म्हणाले की, ‘भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मी माझा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत आहे.
मतदारसंघामध्ये युवा चेहरा हवा म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला होता. असंही धनंजय जाधव यावेळी म्हणाले. समोरच्या पक्षातून जे उमेदवार दिले जात होते ते तीन-चार टर्म आमदार होते. पण एक युवा कार्यकर्ता पदवीधरांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू शकतो असं मला वाटतयं. त्यामुळे मी हा अर्ज दाखल केला होता.अशी माहिती यावेळी धनंजय जाधव यांनी दिली.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारसाठी फिल्डिंग लावली होती. पण त्यांना भाजपकडून एबी फॉर्म न मिळाल्याने नाईलाजाने त्यांना अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला होता. मात्र आता त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे.
धनंजय जाधव हे एके काळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत म्हणून समजले जात होते. त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून नगरसेविका आहेत. मात्र आता ते विखे गटात आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मागितली होती. त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केली होती. मात्र जाधव यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती.