मुंडे-धस यांची गुप्तभेट: बातमी फोडून भाजपने धसांचा गेम केलाय का ?

Dhananjay Munde and Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आष्टीचे भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस ( Suresh Dhas) कमालीचे आक्रमक राहिले. सर्वात प्रथम सुरेश धस यांनी नागपूर अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरला. सुरेश धस यांनी विधानसभेत आक्रमक शैलीमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाचे वर्णन करून सांगितले. त्यानंतर संतोष देशमुख हत्याकांडाचे गांभीर्य राज्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच एसआयटी गठीत केली. त्यानंतर एक-एक साखळी जोडली गेल्याने आरोपींना अटक झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडही सीआयडीसमोर हजर झाला.
चेकवर सही केली, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? अजित पवारांनी सांगितली डेडलाईन
वाल्मिक कराडचा उल्लेख सुरेश धस आका असा करतात. तर धनंजय मुंडे यांना आकाचा आका म्हणतात. त्यानुसार आकाचे आकाही सापडू शकतात, असे ते जाहीरपणे सांगत तेव्हा त्यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे असतो. त्यांनी मुंडेंना बीडचे पालकमंत्री त्यांनी होऊ दिले नाहीत. थेट मंत्रीपदावरून हकालपट्टीची भाषा सुरेश धसांची होती. पण सुरेश धसांची आक्रमकपणाची हवा शुक्रवारी एका बातमीने निघून गेली. ती बातमी होती, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची. माध्यमांमध्ये ही बातमी आली.
आता ब्रह्मास्त्र काढण्याची चांगली वेळ आलीये; सुरेश धस-मुंडे भेट होताच करूणा मुंडे पुन्हा सक्रीय
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule) यांनी ही बातमी कन्फर्म केली. तसेच साडेचार तास एकत्र होतो असेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यानंतर माध्यमांसमोर धस यांनीही मुंडेंची भेट घेतल्याचे कबूल केले. इतकेच नाही तर दुसर्यांदा झालेली भेटही त्यांना सांगावी लागली. आता याच दोन भेटींमधून सुरेश धसांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला का? या भेटीनंतर धस मॅनेज झाले का? या भेटीची बातमी कोणी फोडली? की भाजपनेच बातमी फोडून धस यांची विश्वासार्हता कमी करत त्यांचा गेम केलाय?
भाजपने धसांचा गेम केलाय, तो कसा? हे पाहण्यासाठी या बातमीची क्रॉनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे, धस आणि मुंडे यांची गुप्त भेट ही बातमी माध्यमांमध्ये काल फुटली. त्यानंतर बावकुळेंची यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. ही भेट झाल्याचे बावनकुळे यांनी मान्य केले.
तसेच “आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले. “सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. दोघेही इमोशनल आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासात माझ्यासोबत काम केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत, असे बावनकुळे यांनी म्हटले.”
थोडक्यात दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा बावनकुळे यांचा होता. पण धनंजय मुंडे व धस यांच्यातील वाद मिटविण्यासाठी बाबनकुळेंना कोणी सांगितले होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. सोबतच एरव्ही भेटींबद्दलच्या बातम्यांवर अंग चोरून वावरण्याची परंपरा भाजप नेत्यांनी इथे खंडीत केली. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर रान उठले होते. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबाला पाठिंबा दर्शविला. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, अशी भूमिका जाहीर केली.
आता नामदेव शास्त्री यांच्या पाठिंबा दर्शवल्यावरून रान उठू शकते तर या भेटीची बातमी बाहेर आल्यावर काय राजकीय परिणाम होतील? याचा विचार बावनकुळे यांनी केला नसावा का? मग बावनकुळे यांनी ही भेट झाल्याचे वृत्त नाकारले का नाही? जर बावनकुळे यांनी हे वृत्त नाकारले असते तर ती चर्चा तिथेच थांबली असती. ना धस याबद्दल बोलले असते, ना मुंडे. सुरेश धस देशमुख कुटुंबाचा मसिहा म्हणून काही दिवसांपासून वावरत आहेत. भाजपनेही धस यांना थांबवले नाही. अशात बावनकुळे यांनी ही भेट झाल्याचे मान्यही केले आणि चार-साडे चार तास एकत्र होतो, दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
दुसरी गोष्ट म्हणजे धस यांचे स्पष्टीकरण. या भेटीबद्दल बोलताना धस म्हणाले, ही बाब 15-20 दिवसांपूर्वीची आहे. बावनकुळे यांनी मला भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी धनंजय मुंडे हे पाठीमागून आले होते. योगायोगाने धनंजय मुंडे तिथे आले होते. आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळी, बावनकुळे एवढंच म्हणाले होते की, तुमच्यामध्ये मतभेद आहे की मनभेद आहे? यावर मी म्हणालो की, संतोष देशमुख प्रकरणावर ही बैठक आहे का? यावर बावनकुळे म्हणाले की, काही मिटेल का ? मी म्हटलं, ‘काहीच मिटणार नाही’.
नंतर बावनकुळे आणि धनंजय मुंडेंची बैठक झाली, ते चहा प्यायले आणि भेटून निघून गेले. मग मीही जेवून तिथून गेलो. धनंजय मुंडे हे तिथे येणार याची मला बिल्कुल कल्पना नव्हती, असं धस म्हणाले. आता धस अर्धा तास म्हणत आहेत आणि बावनकुळे चार ते साडे चार तास सांगत आहेत. धस यांनी जे स्पष्टीकरण दिले, ते पाहिल्यास किती सहज घडलेली ही गोष्ट होती असे वाटते. पण बावनकुळे यांनी इतिवृत्तांत सांगितला तो धस यांच्याविषयी नक्कीच संशयास्पद आहे.
दोन महिन्यापासून सकाळ-दुपार ज्यांच्यावर तुम्ही बेफाम आरोप केले, त्यांना तुम्ही गुपचुप भेटत असाल, तेही तब्बल साडेचार तासाची ही भेट असेल तर या भेटीचा सगळा तपशील त्यांनी राज्याला सांगणे आवश्यक आहे. त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ते कर्तव्यही आहे. आपणच राजकीय वातावरण तापवायचे, तेही एका तरुण सरपंचाची हत्या झाल्यानंतर त्या हत्येच्या अनुषंगाने हे सगळे करायचे, आणि पुन्हा भेटीगाठी करत फिरायचे, हे राज्यातील जनतेला थेट मुर्ख बनविण्यासारखे आहे. देशमुख कुटुंबाचे मसिहा म्हणून धस लढत असताना त्यांच्या अशा गुपचुप भेटीला जाण्यामुळे त्यांनी नेमके कोणते साटेलोटे केले, असा प्रश्न या कुटुंबियासह राज्यालाही पडणे सहाजिकच आहे.
याच भेटीबद्दल बोलताना धस यांनी दुसरी भेट झालेली मान्य केले. परवा आपण धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. ते आजारी आहेत, आणि त्यांना भेटणे गैर नाही, असे धसांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कोणी आजारी असेल तर त्याला भेटण्यात काही गैर नाही. अगदी त्यांनी कोणाला भेटावे आणि कोणाला भेटू नये, हाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण दहा दिवसांपासून धस वेगळ्या मूडमध्ये आहेत. परभणीतील सूर्यवंशी प्रकरणात त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. पोलिसांना माफ केले पाहिजे होते. असे ते म्हणाले. त्यावरून मोठा वादंग झाला.
आता धस यांनी जे स्पष्टीकरण दिले त्यावरून ते पहिल्या भेटीत मॅनेज झाले नाहीत, असे म्हणता येऊ शकते. पण दुसऱ्या भेटीबद्दल सांगून धस यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतलं. तुम्हाला काय वाटते? सुरेश धसांनी दिलेल्या कारणांवर कोणी विश्वास ठेवेल का?