परिसीमन विधेयकावर डीएमकेचा यू-टर्न? भाजप सरकारला देणार पाठिंबा, 22 खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष

डीएमकेची मागणी म्हणजे परिसीमनानंतर तामिळनाडूच्या लोकसभा जागांमध्ये प्रमाणानुसार वाढ व्हावी आणि राज्याचे सध्याचे प्रतिनिधित्व कमी होऊ नये.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 28T124237.940

DMK’s U-turn on Delimitation Bill : आतापर्यंत परिसीमन विधेयकाला विरोध करणारा द्रमुक अर्थात डीएमके पक्ष आता या विधेयकाच्या समर्थनार्थ उभा राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी डीएमकेने केंद्र सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. या दोन्ही मागण्या मान्य झाल्यानंतर पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभेतील डीएमकेचे 22 खासदार केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे.

भाजप आणि डीएमके यांच्यात गेल्या वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील माजी सहकारी पक्षांकडून डीएमकेवर टीका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाने आपल्या लोकसभेतील 22 आणि राज्यसभेतील आठ खासदारांची बैठक बोलावली आहे.

डीएमकेची पहिली मागणी म्हणजे परिसीमनानंतर तामिळनाडूच्या लोकसभा जागांमध्ये प्रमाणानुसार वाढ व्हावी आणि राज्याचे सध्याचे प्रतिनिधित्व कमी होऊ नये. तर दुसरी मागणी 1971 च्या जनगणनेला परिसीमनाचा आधार मानून ही व्यवस्था पुढील 25 वर्षे कायम ठेवण्याची होती. 2027 च्या जनगणनेनुसार जागांचे पुनर्वाटप झाल्यास तामिळनाडूच्या जवळपास 10 जागा कमी होण्याची भीती पक्षाने व्यक्त केली होती. लोकसंख्या नियंत्रणात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होऊ नये, अशी डीएमकेची भूमिका होती.

2027 मध्ये निसर्गाचा प्रकोप? एल निनो ऐतिहासिक उच्चांकाच्या दिशेने, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांचा इशारा

या चर्चेत डीएमकेच्या संसदीय पक्षाच्या नेत्या कनिमोळी करुणानिधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या मते, केंद्राने दोन्ही मागण्या मान्य केल्यामुळे हा तामिळनाडूचा राजकीय विजय आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी परिसीमन विधेयकाचा मसुदा जाळून त्याला ‘काळा कायदा’ संबोधले होते. तसेच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन निष्पक्ष परिसीमनाची मागणीही केली होती.

मात्र, आता डीएमकेच्या बदललेल्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि इतर माजी सहकारी पक्ष नाराजी व्यक्त करू शकतात. यावर पक्षाने स्पष्ट केले आहे की, केवळ काँग्रेसच्या राजकीय चिंतेपोटी तामिळनाडूच्या हिताशी तडजोड करता येणार नाही. दरम्यान, स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत डीएमके तामिळनाडूच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही आणि आपल्या तत्त्वांपासून मागे हटणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पक्षाने भूमिका बदललेली नसून केंद्राने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, असा दावा डीएमकेकडून केला जात आहे.

follow us