शिंदे अलर्ट मोडवर, पवार दिल्लीला तर शाह चंदिगढला रवाना; महायुतीत नेमकं चाललंय काय?
Ajit Pawar Arrives In Delhi Amit Shah Leaves For Chandigarh : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashta CM) निकाल जाहीर होऊन आज 10 दिवस उलटले आहेत. त्यानंतरही महायुतीत (Mahayuti) मंत्रिपद वाटपाचा गोंधळ अद्याप कायम आहे. मुख्यमंत्रिपदासह इतर महत्त्वाची खाती कोणाकडे असणार, यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मागील चार दिवसांपासून आजारी असल्याने गावी गेले होते. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेला ब्रेक लागला होता. मात्र, आता एकनाथ शिंदे आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात आज पुन्हा बैठका होणार आहेत. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्रिपदाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) देखील सोमवारी दिल्लीला गेले होते. आपली खाती कमी होऊ नये किंवा जास्तीचे खाते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु अजित पवार दिल्लीला पोहोचता न पोहचता तेच अमित शाह (Amit Shah) मात्र चंदीगढला रवाना झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार आणि अमित शाह यांची भेट काल झालेली नाही.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीसांचा कोट शिवून तयार
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय नेतृत्व धक्कातंत्राचा अवलंब करेल, अशी शक्यता देखील वर्तविली जात होती. परंतू अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पावर कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे केंद्रातील भाजपाचे नेते नाराज असल्याचे देखील कयास बांधले जात होते. मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांनी नाराज नसल्याच स्पष्ट केलं होतं. परंतु शिंदे अचानक दरेगावी गेले, त्यानंतर त्यांनी महत्वाच्या बैठका देखील रद्द केल्या, त्यामुळे पुन्हा महायुतीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी आता पाच डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान भाजप 20, शिंदे गट 13 आणि अजित पवार गटाला 12 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. परंतु महायुतीने मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला किती जागा? हा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात अजित पवार यांच्या ताब्यातील अर्थखाते आणि भाजपाच्या वाट्याला असलेले गृहखाते मागितले आहे.