मोठी बातमी! मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार, महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक सुरू
महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत

Mahayuti Meeting : महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार (Ajit Pawar) अगोदरच दिल्लीत पोहोचले आहेत. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) दिल्लीत पोहोचले आहेत. या नेत्यांची शाह यांच्यासोबत रात्री दहा वाजता बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे.
पैशाची मागणी, गाडीत वाद अन् प्रेयसीची हत्या…, पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला लागले आहेत. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीत खलबतं सुरू आहेत. पाच दिवस उलटून गेले तरीही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. काल याबाबत बोलताना एकनाथ शिंदेंनी अमित शाह आणि मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं म्हटलं. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार, महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक सुरू
दिल्लीत होत असलेल्या या बैठकीत तीन घटक पक्षाकडून गृह, वित्त, नगरविकास, महसूल, जलसंपदा, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, कृषी, गृहनिर्माण, आरोग्य आणि परिवहन खात्यांवर सर्वांची नजर असणार असून यापैकी महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे.
महायुतीच्या सत्ता वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 22 मंत्रीपदे आणि शिवसेनेला 12 मंत्रीपदे मिळतील. तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील सत्तेत कोणता पक्ष, कोणते पद घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एकीकडे शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडला आहे. त्या बदल्यात शिवसेना शिंदे गटाने गृहमंत्रालयावर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपद मिळावे, अशी शिंदे यांची मागणी असल्याचे समजते.
सध्याच्या एकूणच हालचाली पाहता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच असेल असं मानलं जात आहे. मात्र, ऐनवेळी दुसरचे नाव समोर येणार नाही ना, अशी शंका फडणवीस यांच्या चाहत्यांमध्ये आहे.
शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीत गेल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आज आमची महायुतीच्या श्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे. ही बैठक सविस्तर होणार असून बैठकीत सकारात्मक चर्चा होईल. काल मी माझी भूमिका जाहीरपणे मांडली. त्यामुळं सत्ता स्थापनेत माझी कोणताही अडचण नसणार आहे, असं स्पष्ट करत लाडका भाऊ ही माझी ओळख अन्य कुठल्याही पदापेक्षा मोठी असल्याचं शिंदे म्हणाले.
शपथविधी कधी होणार?
भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असेल तरी अद्याप यााबात अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 2 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.