पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का, अधिकृत पाठिंब्याची घोषणा केल्याने खळबळ
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवारला पाठिंबा दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
Pune Teachers Constituency : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची (Pune) चर्चा रंगली असून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसह एकुण पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरुवातीपासुनच चुरस पाहायला मिळाली होती. दोन्ही पक्षांकडुन या जागेवर दावा केला जात होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात अखेर भाजपने बाजी मारली आणि ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यानंतर भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला असतानाही शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला मिळाल्यानंतरही मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चिवटे यांनी आपला अर्ज मागे घेतला. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दुसरीकडे, भाजपकडुन शिंदे यांच्या नाराजीच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. आता या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने मोठी घोषणा केली असून, त्यामुळे भाजपला धक्का बसल्याची चर्चा सुरु झाली आहे.