Munde Accident : फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची भेट घेत प्रकृतीची विचारपूस
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर आता त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील निवासस्थानी भेट घेवून धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
त्याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली.
3 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 च्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीमध्ये अपघात झाला होता. मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती देण्यात आली होती. मतदारसंघातील कार्यक्रम उरकून रात्री परळीकडं परत जाताना हा अपघात झाला होता. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळं अपघाताची घटना घडली होती.
डॉक्टरांनी मुंडे यांना पुढील काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान सक्तीच्या विश्रांतीसाठी पुढील काही दिवस सहकारी-कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन मुंडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात उपचार केलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी, विचारपूस करून काळजी व्यक्त केलेले सर्व मान्यवर तसेच समर्थकांचेही धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.