पवारांनी ६० वर्षात काय केलं? मोदींच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, ट्वीट केला ‘तो’ व्हिडिओ
Jayant Patil On PM Modi : आज शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते अनेक विकासकामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओत मोदी यांनी पवारांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला.
‘मराठा समाज माजलाय असं म्हणत असेल तर..,’; मंगेश साबळेंचा कडक शब्दांत इशारा
मोदींनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काही लोकांनी अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले. मात्र, त्यांच्यासाठी काहीही केले नाही, असे मोदी म्हणाले. यानंतर जयंत पाटील यांनी पीएम मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही, असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत मोदी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुकर करत असल्याचं दिसतं.
या व्हिडिओत मोदी म्हणतात की, क्रिकेटच्या दुनियेत मी आणि शरद पवार होतो. त्यामुळं आमची भेट व्हायची. यावेळी क्रिकेट संदर्भात आमची 10 मिनिटे चर्चा झाली तर शरद पवार शेतकर्यांवर पाच-सहा मिनिटे बोलायचे. कोणताही विषय काढला की, ते पुन्हा शेतकर्यांच्या प्रश्नावर यायचे.
त्यांच्या डोक्यात गाव, शेतकरी आणि शेतीमध्ये तंत्रज्ञान कसं आणता येईल, याचाच विचार असायचा. शेतीमध्ये तंत्रज्ञान आणण्यासाठी ते आग्रही राहायचे. पोस्ट हार्वेस्टिंगबाबत ते जास्त विचार करायचे. आपण सर्व लोक ज्या पध्दतीने शेतीकडे पाहतो, त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून ते शेतीकडे पाहतात त्यांची या गोष्टींकडे पाहण्याची वेगळी पध्दत होती, असं मोदी या व्हिडिओत म्हणत आहे.
ते पुढे म्हणतात की त्यांना शेतीबद्दल सर्व माहिती आहे. त्यांना उसासंबंधी त्यांना विचारलं तर ते एक तास तुम्हाला त्याची माहिती देतील. साखरेचं काय करायचं, किती आयात करायची आहे, असं सर्व त्यांच्या डोक्यात सुरू असतं. यावरून हे दिसतयं की सार्वजनिक जीवन हे त्यांच्यासाठी फक्त पद आणि प्रतिष्ठेसाठी नाही, तर आपल्या लोकांचं कसं कल्याण होईल आणि त्यांच्यासाठी काही करत राहावं, असा त्यांचा प्रयत्न असतो, असं मोदी म्हणाले.
मोदी काय म्हणाले?
महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये कृषिमंत्री होते. वैयक्तिकरित्या, मी त्यांचा आदर करतो, परंतु त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकर्यांकडून साडेतील लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षांत एमएसपीवर 13.5 लाख कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले, असं मोदी म्हणाले होते.