‘शरद पवार हे जातीयवादी…’; शेट्टीच्या शंकेविषयी आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस यांना पाठिंबा देत मंत्रीपदांची शपथ घेतली. या बंडामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले. यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी अजित पवारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्यात सुरू असलेल्या गाठीभेटीमुळं अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. राजू शेट्टी (Raju Shetty) यांनीही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेवरही शंका घेतली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर भाष्य केले.
आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राजू शेट्टी यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही या आधीच स्पष्ट केलं आहे की, आमचे विचार हे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहे. भाजपसोबत कदापी जाणार नाही, असं वारंवार पवार साहेबांनी सांगितलं. आमची लढाई ही वैचारीक लढाई आहे. शरद पवारांनी किती वेळा सांगायचं की, जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असं आव्हाड यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणारा ‘सहकारा’चा अध्यादेश अखेर मागे
यावेळी बोलतांना आव्हाड यांनी नितीन गडकरी यांच्याबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले की, नितीन गडकरींना अडकवण्याचा भाजपचा काहीतरी डाव आहे. कारण सगळे रिपोर्ट नितीन गडकरी यांच्या खात्याशी संबंधित असून त्यांच्यावर ताशेरे मारण्यात आले. आणखी एका मराठी माणसाला अडचणीत टाकण्याचा भाजपचा डाव आहे. नितीन गडकरी यांची भारतीय जनता पक्षातील लोकप्रियता कामाच्या दृष्टीने चांगली आहे, या मराठी माणसाची लोकप्रियता वाढल्याने त्यांना अडचणीत आणले जात असल्याचेही आव्हाड म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या तिढ्याविषयी विचारले असता आव्हाड यांनी सांगिलते की, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत मतभेद नाहीत. लोकशाहीसाठी घातक ठरणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यात तिन्ही पक्ष एकवटले असून देशात इंडियाच्या माध्यमातून अन्य विरोध पक्ष एकत्रित आहे. राज्यातील तिन्ही पक्षांमधील जागावाटपाबाबत बोलायचं झालं तर ज्या जागा जे जिंकतील त्यांना ती जागा दिली जाईल. पर्यायी उमेदवार चांगला असेल तर त्याला नक्कीच संधी दिली जाईल. हा फॉर्मुला ठरलेला आहे. सोलापूर काँग्रेसकडे तर माढा राष्ट्रवादीकडे. त्यावेळी सर्व निर्णय घेतले जातील, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुंबई सिनेटच्या निवडणुकीविषयी आव्हाड म्हणाले की, देशात आणि राज्यात महाविकास आघाडीला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता कमी झाल्यामुळे निवडणुका घेण्यात येत नाहीत. जर निवडणूक झाली तर पराभवाची शक्यता आहे, त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्यात येत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.