‘फडणवीसांकडून महाराजांचे शौर्य कमी करण्याचे प्रयत्न…’, फडणवीसांच्या वक्तव्यावर आव्हाड संतापले
Jitendra Awhad : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक विधान केलं. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीस काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. महाराजांनी स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता. काँग्रेसने आजवर आम्हाला चुकीचे शिकवले आहे. त्यांनी माफी मागावी, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
तर फडणवीस यांच्या या वक्तव्यावर बोलताना आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, फडणवीस साहेबांनी कहर केला आहे. ते म्हणत आहेत की महाराजांनी फक्त छावणी लुटली, सुरत नाही. माझं फडणवीसांना आव्हान आहे. बर्नियर नावाच्या इतिहासकाराने हे लिहून ठेवलं. त्याकाळी सुरत हे व्यापाऱ्यांचे मोठे ठिकाण होते. त्यांच्या मनात लढाईच्या वेळी सुरतेतून मदत झाली हा राग होता. हा आमचा अभिमान आहे. आणि फडणवीस म्हणतात हे सगळं कॉंग्रेसने कलं. काँग्रेस पक्ष इतिहासकारांना सांगायला गेला होता का? महाराज छावणी लुटायला गेले होते असं म्हणता. पण हे चुकीचे आहे. महाराज स्वराज्य निर्माण करण्यासाठी जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करण्याचा प्रयत्न करत आहात, असं आव्हाड म्हणाले.
मोदींचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलटं सुलटं…; शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र
महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत. हा अक्षम्य गुन्हा आहे.. एकदा नाही दोनदा लुटली.फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात? असा सवाल आव्हाड यांनी केला.
कोल्हे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाबाबत दुर्दैवी विधान केले आहे. ते म्हणाले की, सुरतेची लूट केली नाही. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या व्यक्तीकडून असे विधान येणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत भाजपचे नेते सातत्याने अशी विधाने का करत आहेत? अशी विधाने नकळत होतात की जाणूनबुजून केली जातात?, असा सवाल अमोल कोल्हेंनी केला.
शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटली. होय, तो दोनदा लुटली. फडणवीसांना गुजरातच्या बॉसला हे विधान रुजणार नाही, असं वाटलं असेल म्हणून त्यांचा नाईलाजा झाला असावा, असा टोला कोल्हेंनी लगावला.