Kasba Peth Election : भाजपचं कसब्यात ठरलं! टिळक कुटुंबातीलच असणार उमेदवार?
पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. 23 जानेवारी) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कोथरूड येथील बंगल्यावरती भाजपच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.
दरम्यान, या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत टिळक आणि जगताप कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते, असे संकेत दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या बैठकीमध्ये नेमकं निवडणूक कोण लढणार याबाबतची चर्चा करण्यात आली नसून निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे आणि निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीने सध्या भाजप करणार आहे. याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्या समितीवर मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत. तसेच हे मतदारसंघ पारंपारिक असले तरी कोणत्याही प्रकारची त्रुटी न राहता या निवडणुकींना अधिक जोमाने सामोरे जाण्याचा आव्हान पाटलांनी कार्यकर्त्यांना या बैठकीमधून केलं आहे. तसेच यावेळी बोलताना पाटील यांनी आम्ही मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळू शकते, असे अप्रत्यक्षरीत्या संकेत देखील दिले आहेत.
कुटुंबातील व्यक्तींना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असा सवाल माध्यमप्रतिनिधींनी पाटलांना विचारला असता पाटील म्हणाले की, आम्ही कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देणार नाही असं म्हटलेलं नाही, असं संभ्रमात टाकणार उत्तर त्यांनी दिलं. यावर माध्यम प्रतिनिधीने तुम्ही कुटुंबीयांना उमेदवारी देणार असे आम्ही समजायचे का?, असा प्रति सवाल केला असता पाटलांनी या निवडणुकीच्या उमेदवारी या दिल्लीत ठरतात, असे उत्तर दिले.
दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोन्ही मतदारसंघात निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. कसब्यातून टिळक कुटुंबियातील सदस्यच उमेदवार असणार अशा चर्चा रंगत आहेत. तर चिंचवड मध्ये देखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे छोटे बंधू शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. आता भाजप या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे धक्का तंत्र वापरून दुसराच कुणी उमेदवार देतं की कुटुंबीयांना उमेदवारी देत हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.