एकतर माफी मागा, नाहीतर पुरावे द्या; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून किरेन रिजिजूंचा कडक इशारा

राहुल गांधी यांनी संसदेत अशा प्रकारची भाषा वापरू नये. त्यांनी वापरलेले शब्द सभागृहाच्या कामकाजातून हटवले जावेत, असे ते म्हणाले.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 29T142614.770

Kiren Rijiju’s stern warning : परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विद्यार्थीनीचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त हे शब्द वापरले. यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तत्काळ हस्तक्षेप करत राहुल गांधी यांच्या भाषेवर आक्षेप नोंदवला. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. सभागृहाची मर्यादा राखून विधेयकावर चर्चा करावी, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना सांगितले. तसेच, विधेयकाशी संबंधित मुद्द्यांवर बोलण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांनी वापरलेले शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी संसदेत अशा प्रकारची भाषा वापरू नये. त्यांनी वापरलेले शब्द सभागृहाच्या कामकाजातून हटवले जावेत, असे ते म्हणाले. जर असंसदीय भाषा वापरली नसती, तर आम्ही विरोध केला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिजिजू यांनी पुढे म्हटले की, राहुल गांधी विद्यार्थ्यांचा हवाला देत वारंवार हेच शब्द वापरत होते. एकदा नव्हे तर अनेकदा तुम्ही हा चुकीचा शब्द उच्चारला. त्यामुळे हा तुमचाच दृष्टिकोन असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला. त्यावर राहुल गांधी यांनी, मी तो शब्द तुमच्यासाठी वापरलेला नाही, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

एक विद्यार्थी, दुसरे मूर्ख अन् तिसरे मूर्खाला देव मानणारे अंधभक्त; राहुल गांधींचा भाजपसह समर्थकांना जोरदार टोला

या वादात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही हस्तक्षेप केला. विरोधी पक्षनेता सरकारवर गंभीर आरोप करत असेल, तर विद्यार्थ्यांवर कारवाई कोणाच्या आदेशाने झाली याचे स्पष्टीकरण देणे सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. मात्र, यावर रिजिजू यांनी तो वेगळा मुद्दा आहे, असे सांगत मूळ आक्षेप कायम ठेवला. यानंतर राहुल गांधी यांनी सुरक्षा आणि दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यावेळीही किरेन रिजिजू यांनी त्यांना रोखत आक्षेप घेतला. तुम्ही गृहमंत्र्यांचे नाव घेऊन जे शब्द वापरले, त्यासाठी तुम्हाला माफी मागावी लागेल. कोणत्याही ठोस आधाराशिवाय सभागृहात अशा प्रकारचे आरोप करता येत नाहीत, असे रिजिजू म्हणाले.

एकतर माफी मागा किंवा तुम्ही हे विधान कोणत्या आधारावर केले ते स्पष्ट करा. सभागृहाचे कामकाज अशा पद्धतीने चालू शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी अध्यक्षांच्या निर्देशांचाही उल्लेख करत, असे शब्द कामकाजाचा भाग असू नयेत, असे मत व्यक्त केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी बळाचा वापर हा गृह मंत्रालयाच्या आदेशानेच होत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. मी सूचना दिल्यानंतरही तुम्ही त्याच प्रकारचे उल्लेख वारंवार करत आहात. सभागृहाच्या निर्देशांची अवहेलना करणे योग्य नाही, असे अध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चा काही काळ बाजूला पडली आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

follow us